पोलीस खबरी-आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येचा पर्दाफाश
स्पा मालकासह तिघांना अटक; हत्येसाठी सहा लाखांची सुपारी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जुलै २०२४
मुंबई, – पोलीस खबरी असलेल्या आरटीआय कार्यकर्ता गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे याच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेसह वरळी पोलिसांना यश आला आहे. याप्रकरणी वरळी सॉफ्ट टच स्पाचा मालक संतोष सोपान शेरेकर याच्यासह मोहम्मद फिरोज अन्सारी आणि साकिब अन्सारी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शेरेकर हा कटाचा मुख्य सूत्रधार असून त्याने मोहम्मद फिरोज आणि साकिब अन्सारी या दोघांनाही गुरुसिद्धप्पाच्या हत्येसाठी सहा लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर संतोष आणि मोहम्मद फिरोज यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गुरुसिद्धप्पा हा विलेपार्ले परिसरात राहत असून तिथे तो आरटीआय कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात सहा दखलपात्र तर पाच अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. काही वर्ष तो पोलीस खबरी म्हणूनही काम करत होता. त्याच्या एका तरुणीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. तिला भेटण्यासाठी तो नियमित सॉफ्ट टच स्पामध्ये येत होता. ही मैत्रिण पूर्वी मुलुंड येथील स्पामध्ये काम करत होती. मात्र त्याने तिला वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये नोकरीस ठेवले होते. १७ जुलैला त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे स्पाच्या कर्मचार्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीची मागणी केली होती. त्यामुळे सोमवारी रात्री तो मैत्रिणीसह इतर तीन कर्मचार्यांसोबत पार्टीसाठी घेऊन गेला होता. पार्टी करुन ते वरळी येथे आले होते. काही वेळानंतर तो त्याच्या मैत्रिणीसोबत स्पामध्ये गेला तर इतर कर्मचारी निघून गेले होते. मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजता तो त्याच्या मैत्रिणीसोबत असताना तिथे दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्याच्यावर कैचीने वार करुन त्याची हत्या केली. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या गुरुसिद्धप्पाला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गुरुसिद्धप्पाचा मुलगा रोहिदास वाघमारे याच्या तक्रारीवरुन वरळी पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध १०३ (१), ६१ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच मारेकर्यांच्या अटकेसाठी वरळी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच संतोष शेरेकर याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. संतोष हा नवी मुंबईतील सानपाडा, सेक्टर आठच्या स्वस्तिक नर्मदा अपार्टमेंटच्या बी/३०२ मध्ये राहत असून वरळीतील गांधीनगरमध्ये त्याच्या मालकीचे सॉफ्ट टच नावाचे स्पा मसाज पार्लर आहे. संतोष आणि गुरुसिद्धप्पा यांच्यात वाद होता. याच वादातून त्याने त्याची हत्येची सुपारी दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे संतोषला अटक केल्यानंतर या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या एका पथकाने मोहम्मद फिरोजला नालासोपारा येथून तर साकिबसह इतर दोघांना कोटा येथून ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत संतोष आणि मोहम्मद फिरोजला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हत्येसाठी सहा लाखांची सुपारी
मोहम्मद फिरोज आणि साकिब हे दोघेही मूळचे दिल्लीचे रहिवाशी असून मोहम्मद फिरोज हा सध्या नालासोपारा येथे राहत होता. काही दिवसांपूर्वी या दोघांची संतोष शेरेकर याने भेट घेतली होती. या भेटीत त्याने त्यांना गुरुसिद्धप्पाची हत्येची सुपारी दिली होती. ही सुपारी सहा लाखांची होती. त्यापैकी दोन लाख रुपये मोहम्मद फिरोजने स्वतकडे ठेवले तर उर्वरित रक्कम साकिबला दिली होती. हत्येनंतर मोहम्मद फिरोज नालासोपारा येथे गेला तर साकिब हा त्याच्या दोन सहकार्यासोबत निजामुद्दीन एक्सप्रेसने (गरीबरथ) दिल्लीला पळून गेला होता. मोहम्मद फिरोजच्या चौकशीतून साकिबचे नाव समोर आल्यानंतर ही माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर या पथकाने कोटा रेल्वे स्थानकातून साकिबसह इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिघांचा ताबा गुन्हे शाखेला देण्यात आला आहे. त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे.
गुटख्यासाठी जीपे करणे महागात पडले
हत्येपूर्वी गुरुसिद्धप्पा हा त्याच्या मैत्रिणीसह स्पाच्या तीन कर्मचार्यांसोबत वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी शीव येथील एका हॉटेलमध्ये आला होता. तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलिसांनी शीव ते वरळीपर्यंंतचे काही सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये बाईकवरुन दोन तरुण त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले होते. वरळी येथे आल्यानंतर त्यापैकी एका तरुणाने दुकानातून गुटखा खरेदी केला होता. त्यासाठी त्याने त्याला जीपेद्वारे पेमेंट केले होते. या जीपेच्या क्रमांकावरुन पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली. त्यानंतर या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला आणि या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. गुटख्यासाठी जीपे करणे या आरोपीला चांगलेच महागात पडले होते.
गुरुसिद्धप्पाची भीती अखेर खरी ठरली
स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटची माहिती स्थानिक पोलिसांना सांगून त्याने पोलीस खबरी म्हणून काम करताना पोलिसांनी मोठी रक्कम घेतली होती. दुसरीकडे तो स्पा चालकाकडूनही खंडणी वसुली करत होता. त्यातून त्याचे काही स्पा चालकांशी वाद झाले होते. त्यामुळे त्याला स्वतच्या जिवाची भीती होती. त्याचा कधी ना कधी कोणी गेम करणार असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने त्याच्या दोन्ही मांड्यावर २२ जणांची नावे टॅटूद्वारे काढून घेतले होते. त्याच्याबाबत कधी घातपात झाल्यास त्यास संबंधित व्यक्ती जबाबदार असतील असे त्याने टॅटूवरुन सांगण्याचा प्रयत्न केला होता. या २२ नावामध्ये संतोष शेरेकर याच्या नावाचाही उल्लेख होता. हत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी डॉक्टरांना त्याच्या दोन्ही मांड्यावरील टॅटू दिसले होते. ही माहिती नंतर डॉक्टरांनी वरळी पोलिसांना सांगितली होती. गुरुसिद्धप्पाला त्याच्या जिवावर असलेल्या धोकाबाबतची भीती अखेर खरी ठरली.
डायरीत जमा-खर्चासह इतर महत्त्वाची नोंद
गुरुसिद्धाप्पाकडे पोलिसांना एक डायरी सापडली. त्यात त्याने त्याला कोणाकडून कधी आणि किती रुपये मिळाले तसेच खर्चाचा संपूर्ण तपशील लिहून ठेवला होता. याच डायरीत काही महत्त्वाच्या नोंदी सापडल्या असून याबाबत काहीही माहिती देण्यास पोलिसांनी सांगितले. या नोंदीवरुन पोलिसांनी संबंधितांची चौकशी सुरु केली आहे तर काही चौकशीसाठी समन्स पाठविले जाणार आहे.