पोलीस खबरी असलेल्या आरटीआय कार्यकर्त्याची हत्या
हत्येमागील गूढ कायम; मैत्रिणीसह कर्मचार्यांची चौकशी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – पोलीस खबरी असलेल्या एका ५२ वर्षांच्या आरटीआय कार्यकर्त्यांची दोन अज्ञात व्यक्तींनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. गुरुसिद्धप्पा अंबादास वाघमारे असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या हत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत गुरुसिद्धप्पाची मैत्रिण आणि तिच्या तीन सहकारी कर्मचार्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. पूर्ववैमस्नातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजता वरळीतील वरळी नाका सॉफ्ट टच स्पामध्ये घडली. गुरुसिद्धप्पा हा विलेपार्ले परिसरात राहत असून तिथे तो आरटीआय कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर विलेपार्ले पोलीस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात सहा दखलपात्र तर पाच अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. काही वर्ष तो पोलीस खबरी म्हणूनही काम करत होता. त्याच्या एका तरुणीसोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. तिला भेटण्यासाठी तो नियमित सॉफ्ट टच स्पामध्ये येत होता. ही मैत्रिण पूर्वी मुलुंड येथील स्पामध्ये काम करत होती. मात्र त्याने तिला वरळीतील सॉफ्ट टच स्पामध्ये नोकरीस ठेवले होते. १७ जुलैला त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे स्पाच्या कर्मचार्याने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीची मागणी केली होती. त्यामुळे सोमवारी रात्री तो मैत्रिणीसह इतर तीन कर्मचार्यांसोबत पार्टीसाठी घेऊन गेला होता. शीव येथे एका हॉटेलमध्ये पार्टी करुन ते सर्वजण पुन्हा वरळी येथे आले होते. काही वेळानंतर तो त्याच्या मैत्रिणीसोबत स्पामध्ये गेला तर इतर कर्मचारी निघून गेले होते. मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजता तो त्याच्या मैत्रिणीसोबत असताना तिथे दोन तरुण आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. हल्ल्यानंतर ते पळून गेले होते.
जखमी झालेल्या गुरुसिद्धप्पाला मैत्रिणीसह इतरांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मैत्रिणीने दिलेल्या जबानीनंतर वरळी पोलिसांनी दोन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. गुरुसिद्धप्पाची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, त्यामुळे पूर्ववैमस्नातून त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळेस त्याची मैत्रिण तिथे उपस्थित होती, त्यामुळे तिच्यासह पार्टीत सामिल झालेल्या तिन्ही कर्मचार्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या चौघांची चौकशी सुरु असून या चौकशीतून हत्येमागील कारणाचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.