वांद्रे-वरळी सी लिंकवरुन अन्य एका व्यक्तीची आत्महत्या
सुसायट नोट सापडली नसल्याचे आत्महत्येचे कारण अंधारात
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याची मालिका सुरुच असून गुरुवारी रात्री उशिरा अन्य एका व्यक्तीने सी लिंकवरुन समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्ताफ मोहम्मद हुसैन असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो मूळचा गोवंडीतील बैगनवाडी, शिवाजीनगरचा रहिवाशी आहे. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मानसिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन त्याच्या नातेवाईकांची जबानी नोंदवून घेतली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा एक वाजता मध्य नियंत्रण कक्षाला वरळी सी लिंक येथून एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती प्राप्त होताच वरळी पोलिसांसह फायर बिग्रेडच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना पोल क्रमांक ८३ व ८४ च्या मध्ये एक कार दिसून आली. याच कारमधून आलेल्या व्यक्तीने अचानक कार थांबवून समुद्रात उडी घेतली होती. या घटनेनंतर वरळी व वांद्रे विभागाच्या फायर बिग्रेडच्या जवानांनी समुद्रात संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केली होती. ही शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती. मात्र काळोख आणि भरतीमुळे शोधमोहीमेस प्रचंड अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्रकिनार्यावर या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यामुळे त्याचा मृतदेह नायर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला.
प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे नाव अल्ताफ मोहम्मद हुसैन व तो गोवंडी येथील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. या ओळखीनंतर त्याच्या नातेवाईकांना ही माहिती देण्यात आली होती. नायर हॉस्पिटलमध्ये आलेल्या या नातेवाईकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. अल्ताफ हा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.