सोशल मिडीयावर चॅट व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल
दिल्लीतून 45 वर्षांच्या यूट्यूबरला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर पर्सनल चॅट व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन एका महिलेची सुमारे 19 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी 45 वर्षांच्या यूट्यूबरला दिल्लीतून सायबर सेल पोलिसांनी अटक केली. पियुष कल्याल असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध खंडणीसह फसवणुक व अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
आरोपी पियुष कल्याल हा यूट्यूबर असून त्याचा प्रॅक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे त्याचे पाच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. पाच वर्षांपूर्वी एका महिलेने त्याच्या प्रॅक व्हिडीओला लाईक केले होते. त्यानंतर पियुष हा तक्रारदार महिलेच्या संपर्कात आला होता. त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्याच्या प्रत्येक प्रॅक व्हिडीओला ती लाईक करुन त्याचे अकाऊंट फॉलो करत होती. एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर ते तासानतासन गप्पा आणि मॅसेज करत होते. याच दरम्यान त्याने तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
सुरुवातीला तिने त्याला पैसे दिले, त्यामुळे तो सतत तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्याला पैसे दिले नाहीतर तिचे सर्व चॅट सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तिला सतत ब्लॅकमेल करत होता. बदनामीच्या भीतीने तिने त्याला टप्याटप्याने सुमारे 19 लाख रुपये दिले होते. तरीही तो तिच्याकडे पैशांची मागणी करुन तिला धमकावत होता. या धमकीला कंटाळून तिने त्याच्याविरुद्ध उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पियुष कल्याल याच्याविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना त्याला गुरुवारी दिल्लीतून सायबर सेल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तो तक्रारदार महिलेला ओळखत असून तिला ब्लॅकमेल करुन धमकी दिल्याची कबुली दिली. तसेच तिच्याकडून आतापर्यंत सुमारे 19 लाख रुपये घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पियुषची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.