घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी युगो कंपनीच्या मालकाला अटक
होर्डिंग दुर्घटनंतर मुंबईतून अहमदामार्गे राजस्थानात पळाला होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मे २०२४
मुंबई, – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी वॉण्टेड असलेल्या युगो कंपनीचा मालक आणि मुख्य आरोपी भावेश भिंडे याला गुन्हा दाखल होताच अवघ्या तीन दिवसांत गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने राजस्थानातील उदयपूर शहरातून ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्याला मुंबईत आणले जाईल आणि नंतर पुढील चौकशीसाठी पंतनगर पोलिसांकडे सोपविले जाणार आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. होर्डिंग दुर्घटनेनंतर भावेश हा मुंबईहून अहमदाबाद आणि नंतर राजस्थानात पळून गेला होता, तेव्हापासून तो बोगस नावाने उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
घाटकोपर परिसरात रेल्वे पोलिसांच्या मालकीचे एक पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपाजवळील एक होर्डिंग सोमवारी अचानक कोसळले होते. ते होर्डिंग्ज पेट्रोलपंपावर कोसळल्यने त्यात सोळाजणांचा मृत्यू झाला तर साठहून अधिक लोक जखमी झाले होते. ते सर्वजण पेट्रोलपंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी आले होते तर काहीजणांनी अचानक आलेल्या पावसामुळे तिथे आश्रय घेतला होता. याच दरम्यान ही दुर्घटना घडली होती. या घटनेची गृहविभागाने गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रात्री उशिरा युगो कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच भावेश हा पळून गेला होता. त्याच्या घरासह कार्यालयात पोलिसांनी छापा टाकला होता. मात्र तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सातहून अधिक पथक भावेशचा शोध घेत होते. या घटनेनंतर भावेश हा मुंबईहून लोणावळा गेला, तिथेच त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्यानंतर तो कल्याण शिळफाटामार्गे गुजरातच्या अहमदाबादला गेला आणि नंतर राजस्थानात पळून गेला होता. उदयपूर शहरातील एका हॉटेलमध्ये त्याने एक रुम बुक केला होता. तिथे तो बोगस नावाने राहत होता.
ही माहिती मिळताच एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट नऊच्या अधिकार्यांनी उदयपूरच्या हॉटेलमधून भावेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाईल आणि नंतर त्याचा ताबा पंतनगर पोलिसांना दिला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी लोकल कोर्टात हजर करुन त्याची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची पोलिसांकडून मागणी केली जाणार आहे. आतापर्यंतच्या चौकशीत होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट झाले नव्हते. कंपनीने मनपाची परवानगी घेतली नव्हती. होर्डिंगचे काम करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली होती. पेट्रोल पंपाची जागा रेल्वे पोलिसांची असून लोहमार्ग पोलीस आयुक्त कल्याण संस्थेमार्फत आणि राज्य पोलीस महासंचालक यांच्या परवानगीने तिथे बीपीसीएल कंपनीचे एक पेट्रोल पंप सुरु करणयत आले होते. २०२१ साली रेल्वे तत्कालिन पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी युगो मिडीयाला भाडेतत्त्वावर तिथे होर्डिंगसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांकडे कारवाई होणार आहे.