झिशान सिद्धीकी यांच्याकडे दाऊद टोळीकडून खंडणीची मागणी
दहा कोटी रुपये दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी आमदार झिशान सिद्धीकी यांना मेलद्वारे खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. दहा कोटी रुपये दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकीच मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उल्लेख करण्यात आला आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्धीकी यांना सतत जिवे मारण्याची धमकी येत होती, आता त्यांना दाऊदच्या नावाने दहा कोटीच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान या धमकीनंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे.
झिशान सिद्धीकी हे वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या वर्षी ऑक्टोंबर त्यांचे वडिल आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची बिष्णोई टोळीकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तीन शूटरसह 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या आरोपींच्या टार्गेटवर बाबा सिद्धीकी आणि त्यांचा माजी आमदार मुलगा झिशान सिद्धीकी होते. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर त्यांना सतत अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांकडून पोलीस संरक्षण पुरविण्यात आले होते.
गेल्या तीन दिवसांपासून झिशान यांना अज्ञात व्यक्तीकडून मेलद्वारे धमकी दिली जात आहे. या धमकीमध्ये दाऊद इब्राहिमचा उल्लेख करुन अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडे दहा कोटीच्या खंडणीची मागणी केली आहे. ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देण्यात आली आहे. सलग दोन ते तीन दिवसांपासून मेलद्वारे धमकी मिळत असल्याने सोमवारी झिशान सिद्धीकी यांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेतली होती.
याप्रकरणी त्यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. या धमकीमागे दाऊद इब्राहिम टोळीचा सहभाग आहे का की अज्ञात व्यक्तीकडून दाऊद टोळीच्या नावाने खंडणीची मागणी करण्यात आली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.