सहा महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यात यश
पत्रकाराच्या सतर्कमुळे वाराणासीच्या काशी अनाथामात सापडली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून अपहरण झालेल्या एका चार वर्षांच्या मुलीचा शोध घेण्यात परिमंडळ एकच्या विशेष पथकाला यश आले आहे. ही मुलगी उत्तरप्रदेशच्या वाराणासी येथील काशी अनाथामातात जून 2025 पासून वास्तव्यास होती, तिला ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले असून या अपहरणकर्त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. सहा महिन्यानंतर मुलगी सुखरुप सापडल्याने तिच्या पालकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
यातील 28 वर्षांची तक्रारदार महिला ही मूळची सोलापूरची रहिवाशी आहे. तिला चार आणि दिड वर्षांच्या दोन मुली आहेत. तिच्या लहान मुलीच्या पायाला गाठ असल्याने ती तिच्या उपचारासाठी पती आणि दोन मुलीसोबत गेल्या दिड महिन्यांपासून मुंबईत वास्तव्यास होती. तिच्या मुलीवर कामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मुंबई शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने ते कुटुंबिय सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळील तिकिट काऊंटरजवळ झोपत होते.
20 मे 2024 सायंकाळी तिची मुलगी मोठी मुलगी बिस्कीट घेण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र दुकानात गेलेली तिची मुलगी परत आली नाही. त्यामुळे तिच्यासह तिच्या पतीने तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांत तिच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखालली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, प्रविण शिंदे, धनेश सातर्डेकर, पोलीस उपनिरीक्षक सुरज देवरे, रामप्रसाद चंदवाडे, पोलीस हवालदार चव्हाण, शिवगण, घाग, पवार, मोरे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार पांडे यांनी मिसिंग मुलीचा शोध सुरु केला होता. त्यासाठी रमाबाई आंबेडकर मार्ग आणि आझाद मैदान पोलिसांची एक विशेष टिम बनविण्यात आली होती.
या टिमने रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यातील एका फुटेजमध्ये एक व्यक्ती मुलीला घेऊन उत्तरप्रदेशातील वाराणासी येथे जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ही टिम वाराणासी येथे गेली होती. तिथे काही पत्रकारासह माहिती प्रसारक यांच्या मदतीने तिचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच दरम्यान एका पत्रकाराने काशी अनाथ आश्रमात एक मराठी बोलणारी मुलगी जून 2025 मध्ये जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने काशी अनाथ आश्रमात जाऊन या मुलीला ताब्यात घेतले होते. चौकशीत अपहरण झालेली तीच मुलगी असल्याचे उघडकीस आले.
तपासात या मुलीचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. मुंबईतून अपहरण केल्यानंतर त्याने तिला वाराणासी रेल्वे स्थानकात सोडून पलायन केले होते. काही दिवस ही मुलगी तिथेच भटकत होती. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, यावेळी तिच्या पालकांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे तिला पोलिसांनी काशी अनामाश्रात जमा केले होते. या मुलीला उत्तरप्रदेशातून मुंबईत आणल्यांनतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
मे महिन्यांत अपहरण झालेल्या मुलीचा कुठलाही थांगपत्ता नसताना पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून अवघ्या सहा महिन्यांत या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले होते. या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले होते.