मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – शिक्षेच्या सुनावणीदरम्यान इम्रान ऊर्फ इशेरी शेख नावाच्या एका आरोपीने भरकोर्टात धिंगाणा घातल्याचा प्रकार वांद्रे येथील लोकल कोर्टात घडला. मोबाईलवर शूटींग करणार्या महिला पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी इम्रान शेख याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी कोर्टात धिंगाणा घालून सरकारी कामात अडथळा आणून महिला शिपायाशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग करणे, हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून कोर्टाच्या परवानगीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
ही घटना शनिवारी दुपारी दिड वाजता वांद्रे येथील लोकल कोर्टातील 32 व्या कोर्टात घडली. इम्रान हा वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर, राजीवनगरचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध वांद्रे कोर्टात एक खटला सुरु आहे. त्यासाठी त्याला शनिवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले होते. शिक्षेच्या सुनावणीदरम्यान इम्रान हा अचानक आक्रमक झाला होता. त्याने कोर्ट रुमसमोरील काचेवर दोन्ही हात आपटून असभ्य वर्तन केले. तसेच स्वतच्या अंगावरील कपडे काढून तिथे धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो जास्त आक्रमक होऊन धिंगाणा घालू लागला. यावेळी एका महिला पोलीस शिपायाने मोबाईलवरुन घडलेल्या प्रकाराचे शूटींग सुरु केले होते. यावेळी तिला पाहून त्याने अश्लील शिवीगाळ केली.
तिच्यासमोरच पॅण्ट काढून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तिला धक्काबुक्की केली. या प्रकाराने भरकोर्टात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीत हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित पोलिसांनी बळाचा वापर करुन त्याला ताब्यात घेऊन कोर्टाबाहेर नेले. या घटनेनंतर निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी महिला पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इम्रान शेखविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत लवकरच त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.