४८ तासांत शहरात चार अपघातात चौघांचा मृत्यू

वांद्रे-कुर्ला-मानखुर्द-चेंबूर येथील अपघाताची घटना

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ मार्च २०२४
मुंबई,  – गेल्या ४८ तासांत वांद्रे, कुर्ला, मानखुर्द आणि चेंबूर येथील चार अपघातात चौघांचा मृत्यू झाला. त्यापैकी एका मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजवाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी वांद्रे, कुर्ला, मानखुर्द आणि आरसीएफ पोलिसांनी चार स्वतंत्र अपघाताची नोंद करुन तपास सुरु केला आहे. आरोपी चालकांमध्ये एका महिलेचा समावेश असून अपघातानंतर ती पळून गेली होती. त्यामुळे तिच्यासह इतर दोन्ही चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात शुक्रवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास चेंबूर येथील विजय पॅलेस हॉटेलसमोर झाला. आकाश काटे हा ठाण्याचा रहिवाशी असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. कौटुंबिक वादामुळे त्याचे वडिल बसप्पा काटे हे त्यांच्यासोबत राहत नसून ते चेंबूर येथील वाशीनाका, शिवाजीनगर परिसरात राहतात. त्यांना मद्यप्राशन करण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता ते चेंबूरच विजय पॅलेस हॉटेलजवळून जात होते. यावेळी एका बाईकस्वाराने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. जखमी झालेल्या बसप्पाला आरोपी बाईकस्वाराने एका खाजगी आणि नंतर शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. याच दरम्यान अविनाश नावाचा बाईकस्वार रुग्णालयातून पळून गेला होता. याप्रकरणी आकाश काटे याच्या तक्रारीवरुन आरसीएफ पोलिसांनी अविनाशविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून त्याच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या अविनाशचा पोलीस शोध घेत आहेत.

दुसर्‍या अपघातात एका ४५ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. शनिवारी २३ मार्चला पहाटे साडेचार वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्गावरील वाशी चेकनाका पोलीस चौकीसमोर मृत व्यक्ती रस्ता क्रॉस करत होती. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका कारने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू त्याच्याकडे सापडली नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी किरण भाऊसाहेब जोरी या कारचालकाला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. तो डोबिवलीचा रहिवाशी असून अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

चंदनकुमार गनोरराम हे मूळचे बिहारचे रहिवाशी असून एका खाजगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ वर्सोवा-वांद्रे लिंक बनविण्याचे काम सुरु आहे. तिथेच ते सध्या त्यांच्या इतर सहकार्‍यांसोबत काम करतात. मृत रमेश गुटुकडे या सुरक्षाक्षकाला ते गेल्या एक महिन्यांपासून ओळखत होते. शनिवारी ते राजीव गांधी सी लिंक बसस्टॉपजवळील साईटवर रमेशसोबत काम करत होते. गेटमधून येणार्‍या-जाणार्‍या वाहनांचे क्रमांक नोंद करुन त्यांना मुख्य रस्त्यावरुन सुरळीत गाडी काढून देणे असे काम करत होते. यावेळी दुपारी बारा वाजता एका टेम्पोतून त्यांच्या साईटचे सामान आणण्यात आले होते. याच दरम्यान भरवेगात जाणार्‍या एका कारने रमेश गुटुकडे याला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर कार चालविणार्‍या महिलेने तेथून पळ काढला होता. अपघातात जखमी झालेल्या रमेशला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी चंदनकुमार गनोर राम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चालक महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या महिलेच्या कारचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमाकांवरुन तिचा पोलीस शोध घेत आहेत.

कुर्ला येथील अन्य अपघातात आसिफ मकबूल खान या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. रविवारी २४ मार्चला सायंकाळी साडेचार वाजता आसिफ हा त्याच्या बाईकवरुन कुर्ला येथील सांताक्रुज-चेंबूर लिंक रोड, सीएसटी रोड, केजीएन मार्केट ब्रिजजवळून जात होता. यावेळी एका मिक्सर ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात आसिफचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठविणयात आला होता. अपघातप्रकरणी मिक्सर ट्रकचा चालकाविरुद्ध कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी चार स्वतंत्र अपघाताची नोंद केली असून तीन चालक पळून गेल्याने त्यांचा शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page