30 वर्षांच्या अज्ञात व्यक्तीची भरस्त्यात दगडाने ठेचून हत्या

सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने मारेकर्‍याचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – चर्चगेट येथील मस्तकी कोर्ट इमारतीजवळून जाणार्‍या एका 30 वर्षाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून निर्घृणरीत्या हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या मारेकर्‍याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या हत्येचा एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्याच्यासमोरच ही हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता चर्चगेट येथील नाशिकराव तिरपुडे मार्ग, मस्तकी कोर्ट इमारतीजवळील रस्त्यावर घडली. हर्ष जयंतीलाल शहा हा शेअर ब्रोकर असून सध्या फोर्ट येथील फायर बिग्रेडजवळील सय्यद अब्दुल्ला ब्रेववी रोड, जगदीश निवास या अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याचे झव्हेरी बाजार येथे कार्यालय असून शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. त्यापूर्वी त्याने त्याची बाईक मस्तकी कोर्ट इमारतीजवळ पार्क केली होती. दुपारी तो मालाडला कार्यालयीन कामासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजता तो चर्चगेट रेल्वे स्थानकात आला.

बाईक घेण्यासाठी मस्तकी कोर्ट इमारतीजवळ गेल्यानंतर त्याला एका 30 ते 35 वयोगटातील अज्ञात व्यक्तीवर दुसर्‍या अज्ञात व्यक्तीने दगडाने प्राणघातक हल्ला केल्याचे दिसून आले. या व्यक्तीने दगडाने त्याच्या डोक्यात सतत मारहाण करत होती. त्यात त्याचे डोके फुटले होते. हा प्रकार पाहिल्यानंतर तो प्रचंड घाबरला आणि पुन्हा चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेला. तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर काही वेळात आझाद मैदान पोलिसांचे एक पथक तिथे आले होते. या पथकाने रक्तबंबाळ झालेल्या व्यक्तीला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घडलेला प्रकार हर्ष शहा याने पोलिसांना सांगितला होता. त्यानंतर त्याच्या जबानीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन मारेकर्‍याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मृत आणि आरोपी एकमेकांच्या परिचित होते, त्यांच्यात पूर्ववैमस्न होते का याचाही पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page