फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मोस्ट वॉण्टेड आरोपीस आसाम येथून अटक
बोगस पर्चेस ऑर्डर देऊन 53 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका मोस्ट वॉण्टेड व्हाईट कॉलर गुन्हेगार रुपज्योती बोरा याला अखेर दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने आसाम येथून शिताफीने अटक केली. गोरेगाव परिसरातील एका सोलर व्यावसायिकाला दोन बोगस पर्चेस ऑर्डरचे कागदपत्रे देऊन त्याने त्यांची सुमारे 53 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत जे. श्रीनिवासन हा सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन हा संपूर्ण घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शिवकुमार श्रीहरीशचंद्र मिश्रा हे गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड, सॅटेलाईट गार्डन फेस दोनमध्ये राहत असून त्यांची क्षिप्रज नावाची एक सोलर कंपनी आहे. त्यांची कंपनी विविध कंपन्यांकडून इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंगचे कंत्राट घेतात. हा संपूर्ण व्यवहार त्यांच्या घरातूनच चालतो. जे. श्रीनिवासन हे त्यांच्या परिचित असून तो दिल्लीतील द्वारका, काली बर्दी मंदिराजवळील रहिवाशी आहे. ऑक्टोंबर 2020 ते दोघेही सोलर स्ट्रिट लाईटच्या ऑर्डरसाठी आसामला गेले होते. तिथेच त्याने त्यांची रुपज्योती बोराशी ओळख करुन दिली होती. रुपज्योती हा बडा असामी असून त्याचे मोठमोठ्या व्यावसायिकाशी ओळख आहे. त्याने आतापर्यंत अनेक व्यावसायिकाशी कोट्यवधी रुपयांचे सौदे घडवून आणले आहे. त्याच्यासोबत काम केल्यास त्यांच्या कंपनीला चांगला फायदा होईल असे जे. श्रीनिवासनने शिवकुमार मिश्रा यांना सांगितले होते.
त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने रुपज्योतीच्या मदतीने त्यांच्या कंपनीला आसामच्या गुवाहाटी, जुरीपारच्या पंचायत आणि ग्रामीण विकास पंजाबरी आणि तटाबारच्या ठेंगल, कचरी स्वायत्ता परिषदेच्या दोन पर्चेस ऑर्डर आणून दिले होते. त्यात दोन्ही कामाच्या निविदाच्या प्रती जोडण्यात आले होते. ती ऑर्डर सुमारे सहा कोटीची होती. या ऑर्डर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या कंपनीला आधी काही पेमेंट करावे लागतील असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ऑक्टोंबर 2020 ते जून 2023 या कालावधीत जे. निवासन आणि रुपज्योती बोराच्या बँक खात्यात टप्याटप्याने 53 लाख 39 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही ऑर्डर मिळण्यासाठी त्यांनी एका अर्थपुरवठा कंपनीकडून 35 लाख 52 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी जे. श्रीनिवासनने लवकरात लवकर निविदा आणि ऑर्डर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना ऑर्डर मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून ऑर्डरच्या प्रती गुवाहाटीच्या जनता भवन, सचिवालयात सादर केले होते. यावेळी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या ऑर्डरच्या प्रती बोगस आणि खोट्या असल्याचे सांगण्यात आले. सोलरशी संबंधित दोन वर्क ऑर्डर मिळवून देतो असे सांगून या दोघांची त्यांची सुमारे 53 लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. त्यासाठी ते त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. या दोघांकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी जे श्रीनिवासन आणि रुपज्योती बोरा यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. गेल्या दिड ते दोन वर्षांपासून रुपज्योती बोरा हा वॉण्टेड होता. अखेर त्याच्या सीडीआरवरुन त्याला आसामहून दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 26 मेपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
आतापर्यंतच्या चौकशीत रुपज्योती बोरा हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध आसामच्या विविध पोलीस ठाण्यात अशाच प्रकारच्या तीन गुन्ह्यांची नोंद आहे. बोगस दस्तावेज देऊन त्याने अनेक व्यावसायिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.