भाजपा आमदाराला धमकी देणार्‍या आरोपीस अटक

दारुच्या नशेत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – भारतीय जनता पार्टीचे मुलुंड विधानसभेचे आमदार मिहीर कोटेचा यांना एका अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून सत्यवान गरुड या 43 वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. दारुच्या नशेत त्याने मिहीर कोटेचा यांच्या चालकाला कॉल करुन धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले.

मिहीर कोटेचा हे भाजपाचे मुलुंड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांच्या चालकाला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन मिहीर कोटेचा यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर या चालकाने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ज्या मोबाईलवरुन ही धमकी देण्यात आली होती, तो मोबाईल सत्यवान गुरुड या व्यक्तीचा होता. त्याला काही तासांत पोलिसांनी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मद्यप्राशन केले होते, दारुच्या नशेत त्याने ही धमकी दिली होती. सत्यवान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page