मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 मे 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका पाण्याच्या टँकरची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात सलमान जानमोहम्मद चखान या बाईकस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. याप्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात बुधवारी रात्री पावणेबारा वाजता कांजूरमार्ग येथील गांधीनगर जंक्शनजवळील वसंत रबर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेडसमोरील रस्त्यावर झाला. मेहफुज अफझल हाश्मी हा मुलगा विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहतो. तो मूळचा उत्तरप्रदेशच्या प्रतापगढचा रहिवाशी असून सध्या त्याच्या नातेवाईकासोबत राहतो. त्यात मृत सलमानसह शहबान जानमोहम्मद खान, अकबुल हाश्मी आणि आमीर यांचा समावेश आहे. सलमान हा स्विगीमध्ये डिलीव्हरी बॉयचे काम करतो. त्याच्यासोबत इतर नातेवाईक स्विगीमध्ये कामाला आहेत.
बुधवारी रात्री अकरा वाजता मेहफुज हा सलमानसोबत त्याच्या बाईकवरुन जेवण आणण्यासाठी टागोरनगर येथे जात होते. तेथून जेवण घेतल्यानंतर ते दोघेही घराच्या दिशेने येत होते. त्यांची बाईक वसंत रबर फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसमोर येताच एका पाण्याच्या टँकरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती, टॅकरचालकाने बाईकसह सलमान काही अंतर फरफटत नेले होते. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर टँकरचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याने त्याच्या नातेवाईकांनी तिथे बोलाविले होते. काही वेळानंतर त्याचे नातेवाईक तिथे आले आाणि त्यांनी जखमी झालेल्या सलमानला तातडीने जवळच्या महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा सलमानचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मेहफुज हाश्मी याच्या जबानीवरुन पोलिसांनी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टॅकर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर टँकरचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.