सिनेअभिनेता दिनो मोरियाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
मिठी नदीच्या पूर्नर्जिवितता 65 कोटीचा आर्थिक घोटाळा प्रकरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरिया याची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया हादेखील उपस्थित होता. या दोघांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून या दोन बंधूंचे नाव समोर आल्यानंतर ही चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या चौकशीचा तपशील मात्र समजू शकला नाही.
मे महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता दिनो आणि त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली असून त्यांची जबानी नोंदविण्यात आली आहे. ही चौकशी यापुढेही अशीच सुरु राहणार आहे. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप असून या दृष्टीनेही आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले, मात्र गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.