घाटकोपर हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश

हत्येनंतर पळून गेलेल्या मारेकर्‍याला विक्रोळीतून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 मे 2025
मुंबई, – रविवारी दुपारी जिशान रफिक शेख या 36 वर्षांच्या व्यक्तीची घाटकोपर परिसरात झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या सुरज कृष्णा जैस्वाल या मारेकर्‍याला विक्रोळीतून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गाडी चालविण्याच्या क्षुल्लक वादातून सुरजने जिशान शेख यांची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विक्रोळीतील पार्कसाईड, यमुना सोसायटीमध्ये इंजिजामुल अलीमुल्लाद हक हा 19 वर्षांचा तरुण राहतो. रविवारी दुपारी दोन वाजता तो जिशान शेखसोबत त्याच्या व्हॅगनार कारमधून घाटकोपरच्या दिशेने जात होते. ही कार घाटकोपरच्या सर्व्हिस रोड, सुविधा शौचालयाच्या दक्षिण वाहिनीवरुन जात असताना गाडी चालविण्याच्या वादातून जिशान शेख आणि सुरज जैस्वाल यांच्यात वाद झाला होता. काही कळण्यापूर्वीच सुरजने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून चाकू काढून जिशानच्या छातीत भोसकले होते. त्यात तो जागीच कोसळला होता. या घटनेनंतर सुरज हा एका महिलेसोबत बाईकवरुन पळून गेला होता. जखमी झालेल्या जिशानला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन पंतनगर पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता.

या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत (युनिट सात), प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे (युनिट सहा), प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस (युनिट बारा), पोलीस निरीक्षक काकडे, सुतार, बाळगी, राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर, साठे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे, लंबाते, यादव, शेख, रासकर, सांडभोर, प्रजापती, पाटील, चिकणे, पोलीस उपनिरीक्षक काळे, शेलार, परबळकर, शिंदे, सावंत, मोरे, रहाणे, बेळणेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे या युनिट सहा ते बाराच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु केली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सुरज जैस्वाल याला विक्रोळीतून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने जिशानची हत्या केली होती. घटनेच्या वेळेस त्याच्यासोबत एक महिला होती, मात्र या हत्येत तिचा काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर सुरजला पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page