आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज तस्करीप्रकरणी प्रवाशाला अटक
प्रवाशाच्या पोटातून 8.66 कोटीचे कोकेन कॅप्सुल काढण्यात यश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – विदेशातून आणलेल्या कोकेन तस्करीप्रकरणी एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. त्याच्या पोटातून 8 कोटी 66 लाख रुपयांचे कोकेन असलेले कॅप्सुलचा साठा या अधिकार्यांनी जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरुद्ध कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. 24 मेला फ्लाईट क्रमांक युआर 430 मध्ये आरोपी विदेशी नागरिक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याची हालचाल संशयास्पर वाटताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यात त्याने काही पिवळ्या गोळ्या प्राशन केल्याचे दिसून आले होते. त्याने पोटातून कॅप्सुलद्वारे ड्रग्ज आणल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्याला लोकल कोर्टाच्या परवानगीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या पोटातून डॉक्टरांनी काही कॅप्सुल काढल होते. त्यात 866 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 8 कोटी 66 लाख रुपये इतकी किंमत आहे. कोकेनचा साठा जप्त केल्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, मुंबईत ते कोकेन तो कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु आहे.