मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – बोगस सोन्याचे दागिने देऊन त्यामोबदल्यात 19 लाख 43 हजार रुपयांचे नवीन सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या भामट्याला अखेर एक महिन्यानंतर बोरिवली पोलिसांनी अटक केली. राकेश भिमसेन बागला असे या 39 वर्षीय भामट्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून फसवणुक झालेले सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धर्मेश कांतीलाल सोनी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील न्यू साईबाबा नगर, वीणा स्काय हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचे बोरिवली परिसरात न्यू चामुंडा ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे एक दुकान आहे. जुने सोन्याचे दागिने खरेदी करुन ते नवीन दागिने बनवून या दागिन्यांची विक्री करतात. 9 मे 2025 रोजी दुपारी पावणेतीन वाजता ते नेहमीप्रमाणे जेवणासाठी त्यांच्या घरी गेले होते. याच रमयान त्यांच्या दुकानात एक तरुण आला होता. त्याने दुकानातील सेल्समन रिटा वाघेला हिला काही सोन्याचे दागिने दिले होते.
या दागिन्यांच्या मोबदल्यात त्याला नवीन दागिने घ्यायचे होते. त्यामुळे तिने जुने दागिने घेऊन त्याला 19 लाख 43 हजार रुपयांचे नवीन सोन्याचे दागिने दिले होते. बिल बनविताना त्याने स्वतचे नाव विक्रांत ठाकूर असल्याचे सांगितले होते. तिने त्याच्याकडे पॅनकार्डची मागणी केली असता त्याने नंतर पॅनकार्ड आणून देतो असे सांगितले. त्यानंतर तो दागिने घेऊन निघून गेला होता. जेवणानंतर धर्मेश सोनी हे दुकानात आले होते. त्यांनी त्या दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना संशय आला होता.
तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांना बोगस सोने देऊन त्यांच्याकडील 19 लाख 43 हजार रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. दुकानातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राकेश बागला याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले. त्याला ज्वेलर्स दुकानातील कर्मचार्यांनी ओळखले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.