फसवणुकीसाठी एपीके फाईल पुरविणार्या कटातील आरोपीस अटक
आरोपीच्या मुलाने दिडशे एपीके फाईल विक्री केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – हॉस्पिटल अपॉईटमेंट बुकींगच्या नावाने एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी विरेंद्र परशुराम सिंग या आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. एपीके फाईल पाठवून तक्रारदाराची फसवणुक झाली होती. ही फाईल विरेंद्रचा मुलगा रोहित विरेंद्र सिंग याने बनविली होती. त्याने आतापर्यंत दिडशेहून अधिक एपीके फाईल बनवून त्याची सायबर ठगांना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत सहआरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिंग कुटुंबिय उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
७५ वर्षांचे किर्ती कांतीलाल दोषी हे विलेपार्ले येथील एस. व्ही रोड, सुंदरवान, प्रविण अपार्टमेंटमध्ये राहतात. ४ ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांच्या मोबाईलवर हॉस्पिटल अपॉईटमेंट बुकींग नावाची एक एपीके फाईलचा मॅसेज आला होता. ही फाईल ओपन करताना त्यांचा मोबाईल हॅक झाला होता. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवरुन सहा ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यात त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन चार तर त्यांची पत्नी कल्पना हिच्या क्रेडिट कार्डवरुन दोन व्यवहार झाल्याचे दिसून आले होते. या सहाही व्यवहारात अज्ञात व्यक्तीने ३ लाख ८७ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केले होते.
याबाबत बँकेचे मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आला होता. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. प्राथमिक तपासात किर्ती दोषी यांना एपीके फाईल पाठवून अज्ञात सायबर ठगांनी ही फसवणुक केली होती. तात्रिक माहितीवरुन पोलिसांनी विरेंद्र सिंग याला ताब्यात घेतले होते.
तपासात त्याचा मुलगा रोहित हा एपीके फाईल बनवून त्याची सायबर ठगांना विक्री करत होता. त्याने आतापर्यंत दिडशेहून अधिक एपीके फाईल बनविले होते. प्रत्येक फाईलमागे तो सायबर ठगांकडून पंधरा ते वीस हजार रुपये कमिशन म्हणून घेत होता. त्याने दिलेली एपीके फाईल किर्ती दोषी यांना पाठवून ही फसवणुक करण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी विरेंद्र सिंग याला अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला शनिवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रोहित सिंग याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसंाकडून शोध सुरु आहे.