98 लाखांच्या हिर्‍यांचा अपहार करुन व्यापार्‍याची फसवणुक

हिरे व्यापार्‍याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे 98 लाखांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पलक नवीनचंद्र मेहता या हिरे व्यापार्‍याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. पलक मेहता याने अशाच प्रकारे इतर हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

विलेपार्ले येथील रहिवाशी असलेले विपुलभाई लालजीभाई धामी हे हिरे व्यापारी आहेत. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये धामी इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीच्या कार्यालयातून त्यांचे हिर्‍याच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. जिग्नेश मेहता हा ब्रोकर त्यांच्या परिचित असून त्यांच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांना जिग्नेशवर प्रचंड विश्वास होता. 16 एप्रिल 2025 रोजी त्यानेच त्यांची ओळख पलक मेहताशी करुन दिली होती.

तो हिरे व्यापारी असून त्याची भारत डायमंड बोर्समध्ये स्वतची पलश इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी आहे. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारी एक चांगली ग्राहक कंपनी असून त्याला हिर्‍यांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी जिग्नेशच्या सांगण्यावरुन पलक मेहतासोबत हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. एप्रिल महिन्यांत त्यांनी पलकला विक्रीसाठी क्रेडिटवर 98 लाख 60 हजार रुपयांचे 328 कॅरेटचे हिरे दिले होते. यावेळी पलकने त्यांना पंधरा दिवसांत व्यवहार पूर्ण करुन त्यांचे पेमेंट जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्‍यांचे पेमेंट केले नाही किंवा विक्री न झालेले हिरे त्यांना परत आणून दिले नाही.

वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. क्रेडिटवर घेतलेल्या हिर्‍यांची पलक मेहता याने परस्पर इतर व्यापार्‍यांना विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीनंतर तो मोबाईल बंद करुन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच विपुलभाई धामी यांनी घडलेला प्रकार बीकेसी सांगून पलक मेहताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी क्रेडिटवर घेतलेल्या हिर्‍यांचा अपहार करुन तक्रारदार हिरे व्यापार्‍याची फसवणुक केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला. पलक हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page