पत्नीची हत्या करुन वयोवृद्ध पतीची गोळी झाडून आत्महत्या

मुलावरुन झालेल्या वादातून पत्नीनंतर स्वतचे जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – झोपेतच पत्नीची डोक्यात देशी बनावटीच्या कट्ट्याने गोळी झाडून हत्या केल्यानंतर एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळ परिसरात उघडकीस आली आहे. मृतांमध्ये रामनोहर नामपिल्ले आणि लता राममनोहर नामपिल्ले अशी या पती-पत्नीची नावे आहेत. मुलावरुन होणार्‍या वादातून पत्नीनंतर पतीने स्वतचे जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी राममनोहर नामपिल्लेविरुद्ध वरळी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना सकाळी पाच ते साडेपाच वाजता वरळीतील सिद्धार्थ नगर, पंकज मेन्शन इमारतीमध्ये घडली. याच इमारतीमध्ये 65 वर्षाचे राममनोहर हे त्यांची पत्नी लता (55), मुलगा आणि सूनेसोबत राहत होते. ते कत्तारमध्ये इलेक्ट्रीशियन म्हणून कामाला होते. निवृत्तीनंतर ते मुंबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. डिसेंबर 2023 साली त्यांच्या मुलाचे लग्न झाले होते. त्यांच्या मुलाने चांगली नोकरी करुन स्वतची प्रगती करावी. स्वतंत्र राहून घराची जबाबदारी घ्यावी असे त्यांना सतत वाटत होते. मात्र त्याला त्यांच्या पत्नीचा विरोध होता. एकुलता एक मुलगा असल्याने त्याला दुसरीकडे राहण्यास विरोध होता. याच कारणावरुन होणार्‍या वादातून ती नेहमीच तिच्या मुलाची बाजू घेत होती. दोन दिवसांपूर्वी राममनोहर यांचा भाचा घरी आला होता.

रात्री जेवण करुन ते सर्वजण त्यांच्या बेडरुममध्ये झोपले होते. सकाळी साडेपाच वाजता राममनोहर जागे झाले. काही वेळानंतर त्याने त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने झोपेतच त्यांच्या पत्नीच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्याचा आवाज येताच त्यांचा भाच्याला जाग आली होती. यावेळी ते थातुरमातुर कारण सांगून घराबाहेर गेले. इमारतीच्या जिन्यावर काही वेळ बसल्यानंतर त्यांनी त्याच कट्ट्याने स्वतच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. कुटुंबियांकडून ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या राममनोहर आणि लता यांना तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह जे. जे हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.

याप्रकरणी राममनोहर नामपिल्ले यांच्या मुलासह भाच्याची जबानी नोंदविण्यात आली असून त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही. मुलावरुन होणार्‍या वादातून त्यांनी लता हिची हत्या करुन नंतर स्वत आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी राममनोहरविरुद्ध हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. राममनोहर यांच्याकडून गुन्ह्यांतील गावठी कट्टा जप्त केला आहे. हा कट्टा त्यांना कोणी दिला याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page