1.30 कोटीचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापार्याचे पलायन
ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या 1 कोटी 30 लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन एका ज्वेलर्स व्यापार्याने पलायन केल्याची घटना मुंबादेवी परिसरात घडली. याप्रकरणी विजयकुमार जेठामल जैन या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विजयकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कमलेश उधेलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नवी मुंबईतील वाशी, सेक्टर क्रमांक चौदामध्ये राहतात. त्यांचा विविध सोन्याचे दागिने होलसेलमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. विजयकुमार जैन हा त्यांचा परिचित ज्वेलर्स व्यापारी आहे. त्याचे मुंबादेवी रोड, दागिना बाजार परिसरात चौव्हाण ज्वेलर्स नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे.
मार्च महिन्यांत विजयकुमारने त्यांच्याकडे काही ज्वेलर्स दागिन्यांची मागणी केली होती. त्याच्यासोबत त्यांचा यापूर्वीही दागिन्यांचा व्यवहार झाला होता. त्यामुळे कमलेश जैन यांनी त्यांचा सेल्समन कालूराम गुज्जर ऊर्फ शिवम याला विजयकुमारच्या चौव्हाण ज्वेलर्स दुकानात दागिने घेऊन पाठविले होते. यावेळी त्याने त्याला 2 कोटी 30 लाख 12 हजार 462 रुपयांचे विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर दिले होते. त्यामोबदल्यात त्याने त्यांना शुद्ध सोने आणि दागिने पेमेंट देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत विजयकुमारने त्यांना शुद्ध सोने दिले नाही किंवा दागिन्यांचे पेमेंट केले नव्हते. सतत विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. याच दरम्यान विजयकुमार हा स्वतचा मोबाईल बंद करुन पळून गेला होता. हा प्रकार नंतर कमलेश जैन यांच्या लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत विजयकुमार जैनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सुमारे सव्वाकोटीच्या दागिन्यांचा अपहार करुन तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
विजयकुमार हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विफशेष मोहीम हाती घेतली आहे. विजयकुमारने मार्केटमधील अनेक ज्वेलर्स व्यापार्याकडून दागिने घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.