मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन 36 वर्षांच्या व्यक्तीने त्याच्याच सात वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. या घटनेनंतर तो पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
34 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या सात वर्षांच्या मुलीसोबत राहते. आरोपी तिचा पती असून पिडीत मुलीचा सावत्र पिता आहे. कुरिअरला नोकरीला असल्याने ती अनेकदा कामानिमित्त बाहेर राहत होती. त्याचा आरोपीने गैरफायदा घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो घरात कोणीही नसताना पिडीत मुलीशी अश्लील जवळीक निर्माण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याशी लैगिंक चाळे करुन अत्याचार करत होता. तिच्या छातीला आणि पाठीला सतत अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करत होता. तिने हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून तिच्यावर दबाव आणत होता.
अलीकडेच हा प्रकार मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने पिडीत मुलीसोबत मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आरोपी भंगार विक्रीचे काम करत असून त्याने तक्रारदार महिलेशी लग्न केले होते. तेव्हापासून तो तिच्यासह तिच्या सात वर्षांच्या मुलीसोबत एकत्र राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. शुक्रवारी 13 जूनला हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदार महिलेने पोलिसांत तक्रार केल्याचे सांगण्यात आले.