मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – शिक्षिकेच्या नोकरीच्या आमिषाने एका महिलेची 12 लाख 34 हजार रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अजित अशोक इंगळे या भामट्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अजीतने तो राष्ट्रीय मानवाधिकारी ग्रुप, सामाजिक न्याय आयोगमध्ये राष्ट्रीय उपाध्याक्ष म्हणून कार्यरत असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
40 वर्षांची तक्रारदार साक्षी राजेश येलीगेटी ही प्रभादेवी येथे राहते. चार वर्षांपूर्वी तिने डी एडचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती शिक्षिका म्हणून नोकरीच्या शोधात होती. यावेळी तिच्या नातेवाईकांनी तिची ओळख अजीत इंगळेशी करुन दिली होती. तो राष्ट्रीय मानवाधिकारी ग्रुप, सामाजिक न्याय आयोगमध्ये राष्ट्रीय उपाध्याक्ष म्हणून कार्यरत आहे. त्याची शिक्षण विभागात प्रचंड ओळख असून त्याच्यामार्फत तिला शिक्षिका म्हणून नोकरी मिळेल असे सांगितले होते.
मे 2022 रोजी साक्षी व तिचे पती राजेश येलीगेटी यांनी अजीतची दादर येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतली होती. यावेळी त्याने तिला नोकरीचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिला किमान नऊ ते दहा लाख रुपये खर्च येईल असे सांगितले होते. कायमस्वरुपी शिक्षिका म्हणून नोकरी मिळत असल्याने त्यांनी त्याची मागणी मान्य केली होती. 2022 ते 2024 या कालावधीत त्याने त्यांच्याकडून 7 लाख 80 हजार रुपये कॅश तर 4 लाख 54 हजार रुपये धनादेशासह ऑनलाईनने घेतले होते. ही रक्कम दिल्यानंतर तिच्या नोकरीचे नियुक्तीपत्र लवकरच मिळेल असे सांगितले होते. मात्र गेल्या तीन वर्षांत त्याने तिला नोकरी मिळवून दिली नाही.
विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने नोकरीचा विषय सोडून दिला होता. काही दिवसानंतर तिने त्याच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने तिला पैसे दिले नाही. नंतर त्याने तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच साक्षी येलीगेटी हिने माटुंगा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर अजीज इंगळे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.