अमेरिकन दूतावास कार्यालयात बॉम्बची धमकी

तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात असलेल्या अमेरिकन दूतावास कार्यालयात बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण इमारतीची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

वांद्रे परिसरात अमेरिकन दूतावास कार्यालय आहे. शनिवारी रात्री आठ वाजता वाणिज्य दूतावास कार्यालयातील एका कर्मचार्‍याला अज्ञात व्यक्तीने फोन करुन तिथे बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर संबंधित कर्मचार्‍याने ही माहिती बीकेसी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. या संपूर्ण इमारतीची पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली होती. मात्र तिथे कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले.

या घटनेनंतर या कर्मचार्‍याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी खोटी माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तो कॉल कोठून आला होता, कोणी केला होता याचा तपास सुरु केला आहे. अज्ञात कॉलरला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page