मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – ऑनलाईन चालणार्या एका सेक्स रॅकेटचा आरसीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. इक्ब्राना बी अब्दुल रेहमान शेख, मुस्कान अजहारी खान आणि फरीदा शरमुल्ला सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही टोळी ऑनलाईन ग्राहकांशी संपर्क साधून वेश्याव्यवसायासाठी महिलांना शहरातील हॉटेल, लॉज आणि गेस्टहाऊसमध्ये पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ईशान्य मुंबईत सेक्स रॅकेट चालविणारी एक टोळी सक्रिय असून ही टोळी ऑनलाईन ग्राहकांच्या मागणीनुसार काही महिलांना वेश्याव्यवसायासाठी विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित व्यक्तीला संपर्क साधून त्याच्याकडे दोन महिलांची मागणी केली होती. फोनवर संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर या व्यक्तीने दोन महिला घेऊन चेंबूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये येण्यास सांगितले होते.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी सात वाजता इक्ब्राना शेख, मुस्कान आणि फरीदा शेख हे तिघेही दोन महिलांसह राज बारजवळील एका गेस्ट हाऊसमध्ये आले होते. यावेळी त्यांचा बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे पोलिसांनी छापा टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या तावडीतून दोन्ही महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून त्यांना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी तिथे आणण्यात आल्याचे उघडकीस आले. त्याच्या कबुलीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सुटका केलेल्या दोन्ही महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. तपासात या टोळीचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन चालत होता, ग्राहक त्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे तरुणीसह महिलांची मागणी करत होते. त्यानंतर ते त्यांच्या ठरलेल्या हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये त्यांना बोलावून तिथे व्यवहार पूर्ण करत होते. ग्राहकाकडून मिळालेली काही रक्कम बळीत महिलांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ते स्वतजवळ ठेवत होते.