कुर्ला-घाटकोपर एटीएम मशिन चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

दोन्ही गुन्ह्यांची उकल करुन चार आरोपींना पंजाब येथून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 जून 2025
मुंबई, – कुर्ला आणि घाटकोपर परिसरातील दोन एटीएम मशिनमध्ये चोरी करुन पळून गेलेल्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात झोन सहाच्या विशेष पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना पंजाब येथून अटक करुन पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांची उकल केली आहे. जसवीरसिंग सुखदेवसिंग, लखवीरसिंग बलदेवसिंग, गुरुप्रितसिंग करनैल सिंग, रछपालसिंग बलदेवसिंग अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील कार, दोन हजाराची कॅश, तीन मोबाईल, एअरटेल कंपनीचा इंटरनेट डोंगल, तीन सिमकार्ड, मेमरी कार्ड रिडर, ओटीजी आणि बोगस चाव्या आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

संतोष वसंत शेळके हे डोबिवलीतील विष्णूनगर परिसरात राहत असून एका खाजगी बँकेत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतात. या बँकेचे कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात एक शाखा आणि एटीएम सेंटर आहे. गुरुवारी 5 जूनला दुपारी अडीच वाजता बँक कर्मचार्‍यांनी एटीएममध्ये तीन लाखांची कॅश जमा केली होती. एटीएमची तपासणी केल्यांनतर त्यात आठ लाख सात हजार पाचशे रुपये शिल्लक होते. शुक्रवारी 6 जूनला सकाळी सव्वासहा वाजता एटीएम सेंटरमध्ये तीन तरुण आले होते. या तिघांनी बँकेचे एटीएम फोडून आतील 3 लाख 7 हजार 500 रुपयांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. अशाच प्रकारे घाटकोपर परिसरातील एका बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये चोरी झाली होती. या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने 8 लाख 86 हजार 600 रुपयांची कॅश चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी नेहरुनगर आणि घाटकोपर पोलिसांनी स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती.

या गुन्ह्यांची पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी गंभीर दखल घेत नेहरुनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त युसूफ सौदागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विनायक फराकटे, अजय गोलार, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद नानेकर, टिळकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, पोलीस हवालदार दशरथ राणे, श्रीहरी कसबे, संजय आव्हाड, पोलीस शिपाई संदीप पाचुपते, स्वप्निल वानखेडे, विकास काटकर, तुषार भागवत, विशाल परदेशी, अजिंक्य ताजवे यांनी तपास सुरु केला होता.

सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीनंतर या गुन्ह्यांतील आरोपी पंजाब येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पंजाबच्या भटिंडा शहरातून जसवीरसिंग, लखवीरसिंग, गुरुप्रितसिंग आणि रछपालसिंग या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आहे. या टोळीने घाटकोपर आणि कुर्ला येथील दोन एटीएम मशिन फोडून आतील 11 लाख 94 हजार 100 रुपयांची कॅश चोरी करुन पलायन केले होते.

अटकेनंतर या चौघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील कारसह कॅश आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page