मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 जून 2025
मुंबई, – अमेरिकेचा व्हिसा दिला म्हणून रागाच्या भरात त्याने चक्क पश्चिम उपनगरातील वांद्रे परिसरात असलेल्या अमेरिकन दूतावास कार्यालयात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देऊन संपूर्ण तपास यंत्रणेला कामावर लावले, मात्र कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेताना तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे 22 वर्षांच्या तरुणाची चौकशी करुन त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले. हा तरुण 22 वर्षांचा असला तरी त्याची बुद्धी दहा वर्षांच्या मुलासारखी आहे. त्याने अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज केला, त्याचा अर्ज बाद होताच त्याने ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
वांद्रे परिसरात अमेरिकन दूतावास कार्यालय आहे. शनिवारी 14 जूनला रात्री आठ वाजता वाणिज्य दूतावास कार्यालयातील एका कर्मचार्याला अज्ञात व्यक्तीने फोन करुन तिथे बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर संबंधित कर्मचार्याने ही माहिती बीकेसी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते. या संपूर्ण इमारतीची पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली होती. मात्र तिथे कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर या कर्मचार्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी खोटी माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तो कॉल कोठून आला होता, कोणी केला होता याचा तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी एका 22 वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, तो तरुण परळ येथे त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो.
मानसिक आजाराने तो त्रस्त असून त्याच्यावर खाजगी डॉक्टरकडून उपचार सुरु आहेत. त्याच्या आई-वडिलांकडे अमेरिकेचा व्हिसा आहे, त्यामुळे त्यानेही अमेरिकेचा व्हिसा मिळावा यासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यातून त्याने अमेरिकन दूतावास कार्यालयात कॉल करुन बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा तरुण बावीस वर्षांचा असला तरी त्याची बुद्धी दहा वर्षांच्या मुलासारखी आहे. त्यामुळे त्याला अटक न करता नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.