मेडीकल कॉलेजच्या प्रवेशाच्या नावाने गंडा घालणार्‍या महिलेस अटक

कॉलेजच्या ट्रस्टीसह नारायण राणे यांच्या तोतया चुलत्यांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – सिंधुदुर्गच्या एसएसएमपी मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी प्रवेश देतो असे सांगून एका महिलेची सुमारे 45 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मेघना संतोष सातपुते नावाच्या एका महिलेस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत नितेश भास्कर पवार, सावंत काका आणि राकेश गावडे हे तिघेही सहआरोपी आहेत. या तिघांनी आपण कॉलेजचे ट्रस्टीसह भाजपाचे नेते नारायण राणे यांचे चुलते असल्याची बतावणी करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर मेघना सातपुते हिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर इतर तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

51 वर्षांची संजना शशिकांत गोंधळे ही महिला अंधेरीतील वर्सोवा गावात राहते. 2015 साली तिच्या पतीचे निधन झाले असून ती सध्या डॉ. हिरालाल पाटील यांच्या खाजगी क्लिनिकमध्ये मेडीकल सहाय्यक म्हणून काम करते. तिची 23 वर्षांची मुलगी मिताली ही सध्या बंगलोर शहरात बीएचएमएसच्या पहिल्या वर्गात शिकते. पाच वर्षांच्या तिच्या मुलीने नीटची परिक्षा दिली होती. त्यात तिला 315 मार्कस मिळाले होते. तिला मेडीकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. यावेळी तिच्या मुलीची परिचित मेघना हिने तिची नितेश पवार आणि राकेश गावडे यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांनी तिला ते दोघेही सिंधुदुर्गच्या एसएसएमपी मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये ट्रस्टी तसेच भाजपा नेते नारायण राणे यांचे चुलते असल्याचे सांगून मितालीला मॅनेजमेंट कोट्यातून मेडीकलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.

मॅनेजमेंट कोट्यातून दोन जागा असून त्यातील एका जागेवर तिला नक्कीच प्रवेश मिळेल असे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून संजना गोंधळे यांनी या दोघांना पंधरा लाख रुपये दिले होते. मात्र कोरोनामुळे तिचा प्रवेश लांबला होता. कॉलेजचे काही नियम बदलले असून आता प्रवेशासाठी तिला 45 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून तिच्याकडे आणखीन तीस लाखांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय मितालीला प्रवेश मिळणार नाही. तसेच तीस लाख रुपये दिले तर तिला इतर कुठलाही खर्च येणार नाही असे सांगितले. त्यामुळे तिने पैशांची व्यवस्था करते असे सांगितले.

याच दरम्यान मेघनाने सावंत काकाच्या मदतीने तिला मितालीचे कॉलेजमध्ये प्रवेश झाल्याचे दस्तावेज दाखविले होते. तिचे मेरिट लिस्टमध्ये नाव असल्याचे सांगितले. सावंत काका हे कॉलेजमध्ये ट्रस्टी असून त्यांच्या स्वाक्षरी आणि शिक्का असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिने त्यांना टप्याटप्याने तीस रुपये दिले होते. त्यात 38 लाख 65 हजार रुपये एनईएफटीद्वारे तर 6 लाख 35 हजार रुपये कॅश स्वरुपात देण्यात आले होते. अशा प्रकारे तिने त्यांना मार्च 2021 ते एप्रिल 2024 या कालावधीत 45 लाख रुपये दिले होते. त्यासाठी संजना गोंधळे हिने तिच्या नातेवाईकांकडून काही रक्कम उधारीने घेतले होते. मात्र त्यांनी तिचे मेडीकलमध्ये प्रवेश केला नाही. विचारणा केल्यानंतर ते सर्वजण तिला धमकी देत होते.

सतत विचारणा केल्यास तिच्या मुलीचे प्रवेश रद्द करुन तिला 50 टक्के रक्कम परत करु असे सांगत होते. त्यामुळे काही दिवस तिने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने पुन्हा त्यांना कॉल केले होते. यावेळी सर्वांचे मोबाईल बंद येत होते. या सर्वांनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यामुळे तिने सिंधुदुर्गच्या एसएसएमपी मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये तिच्या मुलीच्या प्रवेशाबाबत विचारणा केली होती. यावेळी तिला तिच्या मुलीचे प्रवेश झाले नसल्याचे समजले. तसेच कॉलेजमध्ये नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे नावाचे कोणीही ट्रस्टी नसल्याचे सांगण्यात आले.

अशा प्रकारे मेघनासह इतर तिघांनी ते तिघेही कॉलेजचे ट्रस्टी आणि नारायण राणे यांचे चुलते असल्याची बतावणी करुन मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून संजना गोंधळे या महिलेची सुमारे 45 लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने संबंधित आरोपीविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

फसवणुकीनंतर मेघना ही पळून गेली होती. ती अंधेरी येथे राहत असून नर्स म्हणून काम करते. तिची माहिती प्राप्त होताच तिला अंधेरी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने इतर तिघांच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page