खंडणीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील दुकलीस अटक
एक हजाराचा हप्ता दिला नाही म्हणून हल्ला केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – खंडणीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका दुकलीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. दिपक सुरेश चंदनशिवे आणि जॉयल राजेश काळे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही चेंबूरचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांचा ताबा आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांचे तीन सहकारी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी सांगितले.
ही घटना सोमवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता चेंबूर येथील वाशीनाका, राहुलनगर, भरी गार्डजवळ घडली. योगेश सुधाकर राजगुरु हा चेंबूर परिसरात राहत असून जखमी अविनाश हा त्याचा भाऊ आहे. सोमवारी रात्री उशिरा अविनाश हा त्याचे मित्र राजेंद्र पाटील, दिपक नागवेकर, सुजीत यांच्यासोबत गार्डनमधील कट्ट्यावर मद्यप्राशन करत होते. यावेळी तिथे त्याच परिसरात राहणारे दिपक चंदनशिवे, अरमान, जॉयल काळे, अरमान व दोन अनोळखी इसम असे पाचजण आले. त्यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. त्यांनी एक हजार रुपयांचा हप्ता देण्यास नकार दिला, त्यामुळे रागाच्या भरात या पाचजणांनी अविनाशवर बिअरच्या बाटलीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या गळ्याला, मानेला, पोटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती.
जखमी झालेल्या अविनाशला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी खंडणीसह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. तांत्रिक माहितीवरुन आरोपी वाशी येथे पळून गेल्याचे समजले होते. त्यामुळे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धृतराज, पोलीस उपनिरीक्षक रहाणे, पोलीस हवालदार जाधव, पार, बोढारे, डाळे आदीचे एक पथक नी मुंबईतील कोपरी गावात रवाना झाले तर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे, सहाय्यक फौजदार देसाई यांनी आरोपींच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.
या माहितीवरुन काही आरोपी वाशी येथून सायन-प्रतिक्षानगरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने सायन येथील प्रतिक्षानगर परिसरातून दिपक चंदनशिवे आणि जॉयल काळे या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खंडणीसाठी अविनाशवर बिअरच्या बाटलीने हल्ला केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील जॉयलविरुद्ध एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे तर दिपकविरुद्ध मारामारीसह हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण आणि लैगिंक अत्याचाराचे गुन्हे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी आरसीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.