मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटच्या सुमारे वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी नौशाद रियाजउद्दीन शेख याला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत नफिसा जुल्फीकार सय्यद ही सहआरोपी असून या दोघांनी एका फोटोग्राफरला गंडा घातल्याचा आरोप आहे. अटकेनंतर नौशादला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
हमजा गुलाम हुसैन शेख हा सिनेसृष्टीत फोटोग्राफर म्हणून कामाला असून सध्या त्याच्या आई-वडिल आणि भावासोबत वांद्रे येथे राहतो. त्याला त्याच्या कार्यालयीन कामासाठी जागेची गरज होती. त्यामुळे डिसेंबर 2022 साली त्याने त्याच्या मित्राला सांगितले होते. या मित्राने त्याची नौशादशी ओळख करुन दिली होती. तो वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरात ब्रोकर म्हणून काम करत असून तो त्याला ऑफिससाठी चांगली जागा देईल असे सांगितले होते. काही दिवसांनी नौशादने त्याची नफीसा या महिलेशी ओळख करुन दिली. तिच्या मालकीचे वांद्रे आणि माहीम परिसरात ऑफिससाठी दोन जागा आहेत. या जागेचे कागदपत्रे दाखवून त्याने त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याने दोन्ही जागा त्याच्या कार्यालयासाठी हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचे ठरविले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांच्यात वांद्रे येथील नौपाडा, एएमएस मंझिल इमारतीच्या तळमजल्यावर आणि जोहरा मंझिल इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या जागेसाठी स्वतंत्र करार करण्यात आले होते. या करारानंतर त्यांनी नौशाद शेख आणि नफिसा सय्यद यांना वीस लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून दिले होते. त्यापैकी एका जागेवर नौशादने भाडेकरु ठेवून त्याला दरमाह 19 हजार रुपये देण्यास सुरुवात केली. दहा महिने भाड्याची रक्कम दिल्यानंतर त्याने भाडे देणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर त्याने काही दिवसांत पैसे देतो असे सांगितले. दुसरीकडे तिने दुसर्या जागेचा ताबा न देता तिथे भाडेकरु ठेवून त्याचे भाडेही स्वतकडे ठेवले होते. याबाबत त्याने पुन्हा नौशादकडे विचारणा केली, यावेळी तो मुंबई सोडून अहमदाबाद येथे त्याच्या सासर्याकडे गेल्याचे समजले.
अशा प्रकारे या दोघांनी हेव्ही डिपॉझिटसह भाड्याच्या वीस लाखांच्या रक्कमेचा अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. जागेचा ताबा न देता पैशांचा परस्पर अपहार केला होता. त्यामुळे त्याने निर्मलनगर पोलिसांत या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नौशाद शेख आणि नफिसा सय्यद यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या नौशाद शेख याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत नफिसा सय्यद ही वॉण्टेड आरोपी असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.