मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – मिठी नदीच्या पूर्नर्जिवितेत झालेल्या 65 कोटी 54 लाखांच्या आर्थिक घोटाळ्यात झालेल्या मनी लॉड्रिंगप्रकरणी सिनेअभिनेता दिनो मोरिया व त्याचा भाऊ सॅटिनो मोरिया यांची दुसर्यांदा ईडी कार्यालयात संबंधित अधिकार्यांनी कसून चौकशी केली. तीन तास ही चौकशी झाली. चौकशीनंतर या दोन्ही बंधूंना सोडून देण्यात आले. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीकडून चौकशी सुरु झाल्याने मोरिया बंधूंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
मे महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात मिठी नदी गाळ काढण्याच्या झालेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होंते. हा प्रकार उघडकीस येताच मनपाचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत रामुगडे, गणेश बेंद्रे, तायशेट्टे, दिपक मोहन, किशोन मेनन, जय जोशी, केतन कदम, भुपेंद्र पुरोहित यांच्यासह अॅक्युट डिजाईन्स, कैलास कंन्ट्रक्शन, एन. ए कन्स्ट्रक्शन, निखिल कंन्स्ट्रक्शन, जे. आर एस इन्फ्रास्टक्चर कंपनीच्या संचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच केतन अरुण कदम आणि जय अशोक जोशी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
यातील केतन कदम याचे मोरिया बंधूंशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात अनेकदा मोबाईलवरुन संभाषण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या दोन्ही बंधूंची आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन वेळा चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. याच चौकशीतून या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने मोरिया बंधूंची चौकशी सुरु केली होती. यापूर्वी या दोघांची 12 जूनला चार तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीला एक आठवडा पूर्ण होत नाही तोवर गुरुवारी दिनो आणि सॅटिनो मोरीया यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर ते दोघेही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते.
गुरुवारी सुमारे तीन तासांच्या चौकशीनंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले. यावेळी त्यांना चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्यास सांगणयात आले आहे. याच प्रकरणात ईडीने 6 जूनला मुंबईसह केरळमधील कोची शहरात छापे टाकले होते. त्यात महानगरपालिकेचे इंजिनिअर, कॉन्ट्रक्टर भुपेंद्र पुरोहित, मेसर्च मेटाप्रॉप टेक्निकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्च विर्गो स्पेशलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जय जोशी, मेसर्च वोडर इंडिया एलएलपी कंपनीचे नियंत्रक केतन कदम, सिनेअभिनेता दिनो रोक्को मोरिया, त्याचा भाऊ सॅटिनो रोक्को मोरिया यांच्या कार्यालय आणि घरातून काही डिजिटल डिवाईस, आक्षेपार्ह दस्तावेज, सात लाखांची कॅश जप्त केली होती. तसेच वेगवेगळ्या व्यक्तीसह कंपनीचे बारा बँक खाती, एफडीआर आणि एक डिमेट खाते फ्रिज केले होते. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सव्वाकोटी रुपये इतकी आहे.