मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – एका नामांकित कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन विमा पॉलिसी होल्डरांना संपर्क साधून पॉलिसी नूतनीकरणास प्रवृृत्त करुन फसवणुक करणार्या वॉण्टेड असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. सलीम अकबर सिद्धीकी ऊर्फ अभिषेक सिंग असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सलीम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तीन विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
53 वर्षाचे विशाल भास्कर काटकर हे वरळीतील कोळीवाडा, काटकर हाऊसमध्ये राहतात. सध्या ते एका नामांकित विमा कंपनीत उपाध्यक्ष म्हणून कामाला असून या कंपनीचे मालाड येथे कार्यालय आहे. ही कंपनी ग्राहकांना हेल्थ इंश्युरंस पॉलिसीची सेवा उपलब्ध करुन देते. डिसेंबर 2024 रोजी त्यांना कंपनीचे पॉलिसी होल्डर सुबोध गुलाटी यांनी अभिषेक सिंग नावाच्या एका व्यक्तीने कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन त्यांच्या दोन्ही पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी 53 हजार 979 रुपये घेऊन त्यांची फसवणुक केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची त्यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते.
यावेळी सुबोध गुलाटी यांना आलेल्या मेलची पाहणी करण्यात आली होती. त्यात अभिषेक सिंग नाव सांगणार्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीचा लोगोसह नावाचा गैरवापर करुन अनेक पॉलिसी होल्डरला पॉलिसी नूतनीकरणासाठी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन कंपनीसह पॉलिसी होल्डरची फसवणुक केली होती. चौकशीत त्याने सुबोध यांच्यासह जॅकसन जॉर्ज, रुची जगदीशभाई पटेल, सुल्थानपुर रघुवेंद्र, सुखदेव नवलसिंह झाला, सम्राट गुहा, रॉली मिश्रा व इतर पॉलिसी होल्डरची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले होते. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत त्याने त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार 593 रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करुन ही फसवणुक ेली होती.
हा प्रकार उघडकीस येताच विशाल काटकर यांनी कंपनीच्या वतीने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत बांगुरनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अभिषेक सिंग नावाच्या ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. याच दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी विशेष सेशन कोर्टात अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर तो पळून गेला होता. तो वेगवेगळ्या ठिकाणी विविध नाव सांगून राहत होता.
गेल्या काही दिवसांपासून तो मालाडच्या मालवणी गेट क्रमांक सातजवळ राहत होता. ही माहिती मिळताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत सलीम सिद्धीकी ऊर्फ अभिषेकहा बेरोजगार असून सध्या तो विरार येथे राहत होता. तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या काशिमिरा, माणिकपूर आणि खेरवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती,
मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा अशा प्रकारे अनेकांची फसवणुक करत होता. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच प्रकारच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.