नामांकित मोबाईल कंपनीच्या बोगस एसेसिरीजची विक्री

मोबाईल शॉपमधील छाप्यात अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – नामांकित मोबाईल कंपनीच्या कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन करुन तयार करण्यात आलेल्या बोगस एसेसिरीजची विक्री करुन कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल पथकाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. नागपाडा येथे केलेल्या कारवाईत या अधिकार्‍यांनी मोबाईल शॉपमधून सुमारे अडीच कोटीचा बोगस एसेसिरीजसह इतर साहित्याचा साठा जप्त केला आहे. याच प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर या तिघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांनी सांगितले.

नागपाडा परिसरातील काही मोबाईल शॉपमध्ये नामांकित मोबाईल कंपनीच्या बोगस एसेसिरीज, पेनड्राईव्ह, मेमरी कार्डची विक्री करुन काहीजण संबंधित कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करत आहेत. याबाबत संबंधित कंपनीकडून मुंबई पोलिसांना तक्रार प्राप्त होताच त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सांगळे, रोहन बगाडे, पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर बोरोले, पोलीस हवालदार गणेश डोईफोडे, संतोष पवार, महिला पोलीस हवालदार रिचा मोरवेकर, महिला पोलीस शिपाई अर्चना कासारकर, पोलीस शिपाई संदीप वायळ, आकाश पवार आदींचे दोन विशेष पथकाने बुधवारी नागपाडा येथील लकडा बाजार आणि शुक्लाजी स्ट्रिट परिसरतील मोबाईल शॉपमध्ये अचानक छापा टाकला होता.

या कारवाईत संबंधित मोबाईल शॉपमध्ये कॉपीराईट कायद्याचे उल्लघंन करुन तयार करण्यात आलेल्या नामांकित कंपनीचे बोगस एसेसिरीजसह इतर साहित्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने अ‍ॅपल, बोट आणि सनडिस्क कंपनीचे बोगस एसेसिरीज, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड असा 56 हजार 133 नग जप्त केले होते. त्याची किंमत 2 कोटी 54 लाख 77 हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कॉपीराईट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page