मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – कर्जाच्या वसुलीसाठी होणार्या मानसिक शोषणाला कंटाळून एका 25 वर्षांच्या जिम ट्रेनरने टिळकनगर-चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राहुल विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ अपलोड केले होते. या व्हिडीओमुळे त्याला चारजणांच्या एका टोळीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित चारही आरोपीविरुद्ध वडाळा रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
राहुल हा धारावी परिसरात राहत होता. सध्या तो एका खाजगी फिटनेस सेंटरमध्ये जिम ट्रेनर म्हणून कामाला होता. त्याची जयपूरला एक मैत्रिण असून तिला भेटण्यासाठी तो गेला होता. तेथून परत आल्यानंतर त्याने टिळकनग-चेंबूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी त्याने एका व्यक्तीकडून पर्सनल लोन घेतले होते, त्यापैकी काही रक्कम त्याने परत केले होते. मात्र उर्वरित कर्जाचे नियमित हप्ते त्याला भरता येत नव्हते. त्यामुळे या चौघांकडून त्याला सतत कॉल केला जात होता. त्याच्याकडून त्याचा मानसिक शोषण सुरु होता. अनेकदा ते त्याला शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देत होते.
या मानसिक शोषणाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गुरुवारी राहुलचा मृतदेह टिळकनगर-चेंबूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना सापडला होता. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात असल्याचे वाटले होते. मात्र त्याच्याकडील मोबाईल आणि एटीएम कार्डवरुन त्याची ओळख पटली होती. त्याने त्याच्या कुटुंबियांना तीन व्हिडीओ पाठविले होते. त्यात कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित व्यक्तीकडून त्याचा मानसिक शोषण सुरु असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या चारही व्यक्तींचे नावे त्याने व्हिडीओमध्ये दिले होते. या चौघांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती त्याने केली होती. तिन्ही व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतले असून या व्हिडीओवरुन संंबंधित चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी एका व्यक्तीचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.