प्रवासादरम्यान टॅक्सीत पायलट महिलेचा तिघांकडून विनयभंग

पळून गेलेल्या कारचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – फोर्टच्या काळाघोडा-घाटकोपर प्रवासादरम्यान एका खाजगी टॅक्सीत पायलट महिलेचा तिघांनी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कारचालकासह तिघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नाकाबंदीमुळे आधी दोन आरोपींनी तर नंतर कारचालकाने पलायन केले होते. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आरोपींच्या अटकेसाठी घाटकोपर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

28 वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपर परिसरात राहत असून ती एका खाजगी एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून कामाला आहे. तिचे पती नौसेनेत कामाला असून ते सध्या कुलाबा येथील नौसेनेच्या वसाहतीत राहतात. गुरुवारी 19 जूनला सायंकाळी पाच वाजता ती तिच्या पतीला भेटण्यासाठी कुलाबा येथे गेल होती. रात्री एकत्र जेवण केल्यानंतर पावणेअकरा वाजता फोर्ट येथील काळा घोडा, ड्राईव्ह रेस्ट्रारंटजवळ त्यांनी खाजगी कार बुक केली होती. याच कारमधून ती तिच्या घाटकोपर येथील घरी जाण्यासाठी निघाली होती. ही कार काही अंतरावर गेल्यानंतर चालकाने घाटकोपरला जाण्याचा रुट बदलून दुसरीकडे कार थांबवून दोन अज्ञात व्यक्तींना कारमध्ये बसविले होते. यावेळी तिच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने प्रवासादरम्यान तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता.

या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी दुसर्‍या व्यक्तीने तिला गप्प बसण्यास सांगून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याच व्यक्तीने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. काही अंतर गेल्यानंतर कारचालकाला पुढे नाकाबंदी असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने कारचा वेग कमी केला होता. याच दरम्यान कारमध्ये बसलेले दोन्ही तरुण खाली उतरुन पळून गेले होते. तिला मुंबईची फारशी माहिती नव्हती. त्यानंतर कारचालकाने तिला महिंद्रा पार्क येथे सोडले होते. यावेळी तिने कारचालकाला ते दोन तरुण कोण होते, त्यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले, त्याला त्याने विरोध का केला नाही, त्यांना तू कारमध्ये का घेतले याबाबत विचारणा केली होती, मात्र तो काहीच न सांगता तेथून पळून गेला होता.

घरी येताच तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. दुसर्‍या दिवशी कामावरुन तिचे पती घाटकोपर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन कारचालकासह तिघांविरुद्ध विनयभंगासह दमदाटी करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित कंपनीकडून कारचालकाची माहिती काढण्याचे काम सुरु असून या गुन्ह्यांत त्याच्यासह इतर दोघांनाही लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नाकाबंदी पाहताच दोन आरोपी पळून गेले तर कारचालकाने काही वेळानंतर पळ काढला. नाकाबंदीमुळे पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page