मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलचा डॉक्टर असल्याची बतावणी करुन एका मेडीकल व्यावसायिकाकडून घेतलेल्या 5 लाख 66 हजार रुपयांचे औषधांची डिलीव्हरी घेऊन न वटणारे धनादेश देऊन फसवणुक झाल्याचा प्रकार सायन परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया डॉ. दिपांशू वर्मासह त्याचा सहकारी रिक्षाचालक अशा दोघांविरुद्ध सायन पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
निलेश शिवप्रसाद सिंग हे भाईंदरचे रहिवाशी असून त्यांचा मेडीकलचा व्यवसाय आहे. सायन येथे त्यांच्या मालकीचे कल्याण फार्मा नावाचे एक मेडीकल शॉप आहे. 30 एप्रिलला त्यांना एका व्यक्तीने फोन करुन त्याची ओळख डॉ. दिपांशू वर्मा असल्याचे सांगितले. तो सांताकुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून करतो. त्याला काही औषधांची गरज असून या औषधांची तातडीने डिलीव्हरी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरुन त्याला व्हॉटअपवर औषधांची बिल पाठवून दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी औषध घेऊन त्यांचा कर्मचारी सचिन कदम याला व्ही. एन देसाई हॉस्पिटलजवळ पाठविले होते.
यावेळी दिपांशू वर्माने त्याला ते औषधे रिक्षाचालकाला देण्यास सांगितले. ते औषध रिक्षाचालकाला दिल्यानंतर त्याने त्याला 1 लाख 53 हजाराचा धनादेश दिला होता. 1 मेला दिपांशू वर्माने त्यांना पुन्हा कॉल करुन त्यांच्याकडे आणखीन काही औषधांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा सचिन यादवला औषधांच्या डिलीव्हरीसाठी पाठविले होते. यावेळेसही त्याच रिक्षाचालकाने औषधांची डिलीव्हरी घेत त्याला 1 लाख 93 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. 2 मेला पुन्हा दिपांशू वर्माने केलेल्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी औषधांची डिलीव्हरी केली होती. यावेळी त्यांनी औषधांचे पार्सल घेतल्यांनतर सचिन यादवला पुन्हा 2 लाख 20 हजार रुपयांचा धनादेश दिला होता. दिपांशू वर्माने दिलेले तिन्ही धनादेश त्यांनी त्यांच्या बँकेत जमा केले होते.
मात्र तिन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यापैकी दोन बँकेचे अकाऊंट ब्लॉक होते तर दुसर्या बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नव्हता. या घटनेनंतर त्यांनी दिपांशू वर्माला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे निलेश सिंग हे स्वतला व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी डॉ. दिपांशू वर्मा यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे त्यांना डॉ. दिपांशू वर्मा नावाचे कोणीही डॉक्टर काम करत नसल्याचे समजले. व्ही. एन देसाई हॉस्पिटलचा डॉक्टर असल्याची बतावणी करुन दिपांशू वर्मा या ठगाने त्यांच्याकडून 5 लाख 66 हजार रुपये औषध घेऊन बोगस धनादेश देऊन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायन पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तोतया डॉ. दिपाशू वर्मासह त्याचा सहकारी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.