मुलीच्या विवाहासाठी घेतलेल्या दागिन्यांसह कॅशची चोरी
मालवणीतील घरफोडीच्या गुन्ह्यांतील त्रिकुटाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – मुलीच्या विवाहासाठी घेतलेल्या विविध सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह कॅशची चोरी करुन पळून गेलेल्या एका त्रिकुटाला गुन्हा घडल्यानंतर काही तासांत मालवणी पोलिसांनी अटक केली. शेरखान फिरोज खान ऊर्फ शेफ, सोहेल अस्लम शेख ऊर्फ घोडा आणि अशपाक इस्तियाक अन्सारी ऊर्फ चिरा अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असून त्यांच्या अटकेने घरफोडीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही घटना गुरुवारी 12 जूनला रात्री उशिरा मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक आठ अबुजवाडीतील राम रहिम चाळीत घडली. याच चाळीत सफरदरअली इस्लाम खान हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून ते फर्निचर कारागिर म्हणून काम करतात. 12 जूनला त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. लग्नानंतर दोन दिवसांनी ती तिच्या घरी आली होती. तिला दुसर्या दिवशी पुन्हा तिच्या सासरी जायचे होते. त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी घेतलेले कपडे, सोन्या-चांदीचे दागिने आणि काही कॅश एका बॅगेत ठेवले होते. मुलीला सासरी सोडायचे असल्याने संपूर्ण कुटुंबिय लवकरच जेवण करुन झोपले होते. यावेळी
अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या मागच्या दरवाज्यातून घरात प्रवेश केला होता. यावेळी चोरट्याने मुलीच्या बॅगेतील विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि चाळीस हजार रुपयांची कॅश असा सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच सफरदरअली खान यांना धक्काच बसला होता. त्यांनी घरात दागिन्यांचा शोध घेतला, मात्र त्यांना कुठेच दागिने सापडले नाही. त्यामुळे त्यांनी 16 जूनला मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी काही तासांत शेरखान, सोहेल आणि अशपाक या तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून त्यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.