मेल एक्सप्रेसमध्ये वयोवृद्ध महिलेचे 35 लाखांचे दागिने पळविले

बारा तासात आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – इंदौर-दौंड मेल एक्सप्रेसने प्रवास करणार्‍या एका वयोवृद्ध महिलेच्या लेडीज पर्समधील सुमारे 35 लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि कॅश पळविणार्‍या आरोपीला अवघ्या बारा तासांत कल्याण रेल्वे आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत चिपळून येथून अटक केली. महेश घाग ऊर्फ विक्की असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. महेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी 19 जूनला तक्रादार वयोवृद्ध महिला सायकाळी साडेचार वाजता इंदौर-दौंड एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने येत होती. दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी तिला झोपेतून जाग आली. त्यावेळेस ती एक्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी तिला तिच्या उशाखाली ठेवलेली तिची पर्स दिसली नाही. या पर्समधील हिरेजडीत तसेच सोन्याचे दागिने आणि कॅश असा 35 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला होता. हा प्रकार लक्षात येताच तिने कल्याण रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका फुटेजमध्ये पोलिसांना रेल्वेतील सराईत गुन्हेगार महेश घाग ऊर्फ विक्की दिसला होता. त्यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. तपासात तो चिपळून येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याला चिपळून येथून शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी कल्याण येथे आणण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी हिरेजडीत तसेच सोन्याचे दागिने, तीन हजार शंभर रुपयांची कॅश, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर साहित्य असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला चोरीच्या सर्व मुद्देमालासह शिताफीने अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, सुधाकर शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, रोहित सावंत यांच्या पथकातील कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सावंत, पोलीस अंमलदार संदीप गायकवाड, राम जाधव, स्मिता वसावे, लक्ष्मण कळकुंडे, प्रमोद दिघे, रविंद्र ठाकूर, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रुपेश निकम, सुनिल मागाडे, स्वप्निल नांगरे, पद्ममा केंजळे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद देशमुख, तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देवीदास अरण्ये, पोलीस हवालदार विक्रम चावरेकर, संदेश कोंडाळकर, पोलीस शिपाई अमोल अहिनवे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page