शिपिंग नोकरीसाठी नियुक्ती करुन बिगारी कामाला लावले
दुबईमार्गे इराणला पाठवून बेरोजगार तरुणांची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – शिपिंग नोकरीसाठी नियुक्ती केलेल्या बेरोजगार तरुणांना दुबईहून इराणला बिगारी कामगार म्हणून कामावर ठेवून या तरुणांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. फसवणुक झालेल्या काही तरुणांनी आंबोली पोलिसांत धाव घेऊन क्रिस्टल शीप मॅनेजमेंट कंपनीविरोधात केली होती. या तक्रारीनंतर कंपनीचा मालक मोहित ऊर्फ मोमीन चौहाण, त्याचे दोन कर्मचारी सोहेल आणि सिराज अशा तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रामेश्वर उमाशंकर गुप्ता हा 25 वर्षांचा तरुण मूळचा उत्तरप्रदेशचा गाजीपूरचा रहिवाशी आहे. त्याने वाराणसी येथील असाम मरिन कॉलेजमधून सहा महिन्यांचा शिपिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. गेल्या दोन वर्षापासून तो मुंबई शहरात नोकरीचा शोधात होता. याच दरम्यान त्याने अंधेरीतील क्रिस्टल शीप मॅनेजमेंट कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याची मुलाखत होऊन त्याला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. 21 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीत गेला होता. तिथे त्याची सोहेल या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने कंपनीचे मालक कॅप्टन मोहित ऊर्फ मोमीन चौहाण त्याची मुलाखत घेणार असल्याचे सांगितले. मुलाखतीनंतर त्याला दुबईतील शिपिंगमध्ये नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते.
नोकरीसह मेडकील आणि इतर कामासाठी पैसै जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने सोहेलला 54 हजार 500 रुपये मेडीकलसह नोकरीसाठी टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर त्याची मेडीकल करण्यात आली होती. डिसेंबर 2024 रोजी त्याने उर्वरित साडेचार लाख रुपये सोहेलला दिले होते. ही रक्कम दिल्यानतर त्याला काही दिवसांत नोकरीचे कॉल लेटर येईल असे सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे 14 मार्चला त्याला कार्यालयात बोलावून त्याची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. यावेळी त्याला शारजाचे तिकिटासह टुरिस्ट व्हिसा देण्यात आला होता. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने सुरुवातीला टुरिस्ट व्हिसावर पाठविले जाते. त्यानंतर 17 मार्चला तो शारजाला गेला होता. तिथे त्याला एक व्यक्ती भेटला, त्याने त्याला एका गेस्ट हाऊसमध्ये आणले. तिथे दहा ते बारा तरुण होते. या सर्वांना पुढील दहा दिवसांत शिपिंगवर जॉयनिंग होईल असे सांगण्यात आले.
9 जानेवारीला त्यांना शारजाहून इराणच्या सिराज येथे नेण्यात आले. एका गेस्ट हाऊसमध्ये आणल्यानंतर तिथे आणखीन पंधरा ते वीस भारतीय नागरिक होते. तिथे त्यांची शंभर डॉलरच्या पेमेंटवर स्वाक्षरी घेण्यात आली. त्यांना शिपिंगवर कामावर न ठेवता बिगारी कामगार म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर मोहित चौहाण याच्या सांगण्यावरुन त्यांना ते काम देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी रामेश्वरने बिगारी कामगार करण्यास नकार देत त्याला भारतात पाठविण्याची विनंती केली. त्यानंतर त्याला कंपनीच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही असा जबाब नोंदवून व्हिडीओ बनविण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यांना भारतात पाठविले होते. घडलेला प्रकार रामेश्वरने त्याच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी त्याला पैसे पाठविले होते.
पेसे मिळाल्यानंतर ते ओमान येथून मुंबईत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर रामेश्वरने कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करुन जाब विचारुन नोकरीसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी मोहित चौहाणने त्याने इराण देशात काही मुलींची छेड काढली आहे अशी तक्रार मुंबई गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैसे मिळणार नाही, पोलिसांत तक्रार केल्यास त्यांना इराण पोलिसांकडून अटक करुन तिथे चौकशीसाठी पाठविले जाईल अशी धमकी दिली. नोकरीच्या आमिषाने मोहित व त्याच्या सहकार्यांनी त्याच्यासह यश राजलाल चौहाण, गणेश नाईक, विकास कुमार यांच्याकडून सुमारे साडेदहा लाख रुपये घेतले होते.
मात्र त्यांना शिपिंगवर कामावर न ठेवता बिगारी कामगार म्हणून काम देऊन त्यांची फसवणुक केली. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलिसांत संबंधित सर्व आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर क्रिस्टल शीप मॅनेजमेंट कंपनीचा मालक मोहित चौहाण, त्याचा कर्मचारी सोहेल आणि सिराज यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.