बँकेची बोगस लिंक पाठवून मोबाईल हॅक करुन फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – बँकेची बोगस लिंक पाठवून मोबाईल हॅक करुन बँक खात्यातून पैशांवर डल्ला मारणार्‍या एका सायबर ठगाला अटक करण्यात एमएचबी पोलिसांना यश आले आहे. प्रकाशकुमार कुंजलाल महातो असे या ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने जसलोक हॉस्पिटलच्या एका व्हॉटअप ग्रुपमध्ये बँकेची बोगस लिंक पाठवून ही फसवणुक केली होती. तक्रारदार नर्ससह तिच्या काही मैत्रिणीच्या बँक खात्यातून पैशांचा अपहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सायली कृष्णा महाडिक ही 24 वर्षांची तरुणी ही मूळची रत्नागिरीच्या संगमेश्वरची रहिवाशी असून सध्या ती तिच्या भावासोबत बोरिवली परिसरात राहते. ती सध्या जसलोक हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असून तिच्या हॉस्पिटलचा एक व्हॉटअप ग्रुप आहे. 25 एप्रिलला ती नाईट शिफ्टसाठी कामावर जात होती. यावेळी तिला तिच्या हॉस्पिटलच्या व्हॉटअप ग्रुपवर एका बँकेच्या खात्याची केवायसी अपडेट करण्यासाठी एपीके फाईलची लिंक आली होती. ग्रुपच्या सर्व नर्सेसच्या याच बँक खात्यात पगार जमा होत असल्याने तिने ती लिंक ओपन केली होती. त्यानंतर तिच्या मोबाईलवर बँकेचा अ‍ॅप डाऊनलोड झाला होता.

कामावर जायची घाई असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसर्‍या दिवशी तिला ग्रुपमधील इतर लोकांना ही लिंक मिळाल्याचे तसेच ही लिंक फ्रॉड असून ती लिंक कोणीही ओपन करु नका असा मॅसेज दिसला होता. मात्र तिने आदल्या दिवशीच लिंक ओपन केली होती. त्यामुळे तिने तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिला बँकेचे काही मॅसेज आल्याचे दिसून आले. या मॅसेजमधून तिला बँक खात्यातून 21 हजार रुपये इतर बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे निदर्शनास आले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने तिच्या काही मैत्रिणींना ही माहिती दिली होती. यावेळी त्यांचीही अशाच प्रकारे फसवणुक झाल्याचे तिला समजले होते. त्यामुळे तिने सायबर हेल्पलाईन क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केली होती. त्यानंतर ती गावी निघून गेली होती.

16 जूनला तिने ऑनलाईन तक्रारीसह एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकाने प्रकाशकुमार महातो याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली.

फसवणुकीची काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने बँकेची बोगस लिंक पाठवून अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page