साडेदहा लाखांचे दागिने-कॅश घेऊन केअरटेकरचे पलायन
डॉक्टरच्या तक्रारीवरुन केअरटेकरविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी एक महिन्यांपासून कामावर ठेवलेल्या केअरटेकर तरुणानेच कपाटातील सुमारे साडेदहा लाखांचे विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमालावर हातसफाई करुन पलायन केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉक्टरच्या तक्रारीवरुन विपुलभाई बडाभाई सोलंकी या 27 वर्षांच्या केअरटेकर तरुणाविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तो गुजरातच्या सुरेंद्रनगरचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच गुजरातला जाणार आहे.
संतोष शिवाजी मराठे हे गोरेगाव येथील गोकुळधाम, हिना-गौरव ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी सुजाता डॉक्टर आहेत. त्यांचे वयोवृद्ध आई-वडिल शिवाजी आणि सिंधू मराठे हे मालाड येथील दफ्तरी रोड, ज्ञानधारा इमारतीमध्ये राहतात. ते दोघेही वयोवृद्ध असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी गेल्या एक महिन्यांपासून विपुलभाई सोलंकी या 27 वर्षीय तरुणाला पूर्णवेळ केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. विपुलभाईला ठाण्याच्या माय हाऊस मेड या कंपनीने पाठविले होते. 14 जूनला त्याने संतोष मराठे यांना कॉल करुन त्याचे वडिल आजारी असल्याने तो त्याच्या गुजरात येथील सुरेंद्रनगर, लोया गावी जात असल्याचे सांगितले. त्यामुळे कंपनीने त्याच्या जागी अशोक खेडकर याला त्यांच्या घरी पाठविले होते.
22 जूनला विपुलभाई पुन्हा त्यांच्या घरी आला होता. त्यानंतर अशोक खेडकर हा त्यांच्या घरातून निघून गेला होता. याच दरम्यान त्यांच्या आई-वडिलांच्या घरातून काही सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. ही माहिती संतोष मराठे यांना त्यांचा भाऊ उमेश मराठे याच्याकडून समजले. त्यामुळे ते त्यांच्या आई-वडिलांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांची आई सिंधु ही तिच्या भाचीकडे सांताक्रुज येथे गेली होती. यावेळी कपाटातील दागिने व्यवस्थित होते. मात्र घरी आल्यानंतर विपुलभाई हा घरी नव्हता. यावेळी तिने कपाटातील सामानाची पाहणी केली असता विविध सोन्याचे दागिने आणि दहा हजाराची कॅश असा दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे सिंधू मराठे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तिने विपुलभाईला कॉल केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता.
दुपारी गेलेला विपुलभाई रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. तोच सोन्याचे दागिने आणि कॅश घेऊन पळून गेल्याचे निदर्शनास येताच तिने तिचा मुलगा उमेशला ही माहिती सांगितली. या घटनेनंतर ंसंतोष मराठे यांनी दिडोंशी पोलिसांत त्यांचा केअरटेकर नोकर विपुलभाई सोलंकी याच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिीसांनी चोरीचा गुन्हा नोंद करुन पळून गेलेल्या केअरटेकरचा शोध सुरु केला आहे.