करार केलेल्या दोन रुमची परस्पर विक्री करुन फसवणुक

अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 जून 2025
मुंबई, – करार केलेल्या दोन रुमचा ताबा न देता परस्पर विक्री करुन एका 42 वर्षांच्या महिलेची साडेबारा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी कपिल केसरीनाथ पाटील या मुख्य आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. स्वस्तात रुम देण्याची बतावणी करुन त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

वंदना हरीश गांधी ही महिला मिरारोड येथे राहते. जुलै 2019 रोजी तिची एक मैत्रिण तिच्या घरी आली होती. यावेळी तिने कपिल पाटीलविषयी माहिती दिली होती. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांची कांदिवलीतील चारकोप गाव, डिंगेश्वर मंदिर परिसरात एक प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये कपिल पाटील हा रुम बांधणार आहे. या जागेवर बांधकाम सुरु झाले असून सोळा रुम बांधण्याची त्याची योजना आहे. स्वस्तात रुमची विक्री होत असल्याने तिने तिला गुंतवणुक म्हणून रुम घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ती तिच्यासोबत तिथे जागेची पाहणीसाठी गेली होती. यावेळी तिला तिथे रुमचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. बांधकाम साईटवर स्वत कपिल पाटील उपस्थित होता. त्यामुळे तिने त्याची भेट घेऊन तिला तिथे रुम घेण्याची इच्छा असल्याचे सांगतले होते.

याबाबत त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर कपिल पाटीलने तिला चौदा लाखांमध्ये 220 स्कवेअर फुटाचे रुम क्रमांक अकरा आणि बारा देण्याचे आश्वासन दिले होते. चौदा लाखांमध्ये दोन रुम मिळत असल्याने तिने त्याला टप्याटप्याने साडेअकरा लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात रुम खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. या करारानंतर तिने त्याला आणखीन एक लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम रुमचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कपिलने तिला रुमचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती स्वत रुमची पाहणी करण्यासाठी गेली होती. यावेळी तिला तिच्या रुममध्ये पाटील नावाची पाटी दिसली. तिथे दुसरेच कोणीतरी राहत होते. याबाबत कपिलकडे विचारणा केल्यानंतर त्याने तिथे कामगार राहत असल्याचे सांगून तिला टाळण्याा प्रयत्न केला.

जून 2023 रोजी ती पुन्हा तिथे गेली असता तिच्या दोन्ही रुममध्ये रामचंद्र काशिराम बावकर-रसिका रामचंद्र बावकर आणि विजय पांडुरंग अखाडे-अंजली विजय अखाडे हे कुटुंबिय राहत असल्याचे दिसले. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर तिला ते रुम त्यांना कपिल पाटील याने विक्री केल्याचे समजले. ही माहिती ऐकल्यानंतर तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने पुन्हा कपिलकडे जाब विचारला होता. यावेळी त्याने तिला काही दिवसांत दोन्ही रुमचा ताबा किंवा दुसरे रुम देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. 2019 ते 2023 या चार वर्षांत रुमचा ताबा दिला नाही किंवा रुमसाठी घेतलेले पैसे परत केले नाही.

रुमसाठी साडेबारा लाख रुपये घेऊन कपिल पाटील तिच्याशी करार केलेल्या दोन्ही रुमची परस्पर विक्री करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच चार दिवसांनी कपिल पाटीलला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page