शेअर विक्रीसाठी घेतलेल्या 1.40 कोटीचा अपहार करुन फसवणुक
कर्नाटकच्या व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 जून 2025
मुंबई, – शेअर खरेदी-विक्रीचा करार करुन कराराप्रमाणे एक कोटी चाळीस लाखांचे दहा हजार शेअरची डिलीव्हरी न करता एका 60 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाची त्याच्याच परिचित आरोपी व्यावसायिकाने फसवणुक केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रजत अमरचंद्र जैन या कर्नाटकच्या व्यावसायिकाविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रजत जैनने शेअर खरेदी-विक्रीचा इतरांशी व्यवहार केला आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
विजय प्रविणचंद्र शाह हे वयोवृद्ध बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. रजत जैन हा त्यांचा परिचित असून त्याचाही शेअरशी संबंधित व्यवसाय आहे. रजत हा मूळचा कर्नाटकच्या बंगलोरचा रहिवाशी असून तिथेच त्याच्या मालकीची रक्षा माता व्हेंचर्स नावाची एक खाजगी कंपनी आहे. एप्रिल महिन्यांत त्यांच्यात शेअर खरेदी-विक्रीबाबत संभाषण झाले होते. यावेळी त्याने त्यांना प्रतिशेअर दिड हजाराप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे 50 हजार अनलिस्टेड शेअर विक्रीची ऑफर दिली होती. या शेअर खरेदीमध्ये भविष्यांत त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे 50 हजार अनलिस्टेड प्रतिशेअर दिड हजारामध्ये विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. या खरेदी-विक्रीचा त्यांच्यात एक करार झाला होता.
एप्रिल ते जून 2025 या कालावधीत विजय शाह यांनी रजत जैन याला शेअर खरेदीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्याने त्यांना 40 हजार शेअरची डिलीव्हरी केली होती. मात्र उर्वरित 1 कोटी 40 लाखांचे दहा हजार शेअर डिलीव्हर केले नाही. याबाबत त्यांच्याकडून रजतकडे सतत विचारणा केली जात होती. मात्र तो प्रत्येक वेळेस त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. शेअर विक्रीच्या बहाण्याने रजत जैन याने त्यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच विजय शाह यांनी बोरिवली पोलिसांत रजतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी शेअर विक्रीसाठी घेतलेल्या 1.40 कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत रजत जैनची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्याने विजय शाह यांच्यासह इतर काही लोकांशी शेअरची खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांचीही आर्थिक फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.