कांदिवलीतील शाळेत पुन्हा ईमेलद्वारे बॉम्बची धम्की

शाळा इमारतीची तपासणीनंतर अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – कांदिवलीतील शाळेत पुन्हा ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण शाळेच्या इमारतीची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बॉम्बची धमकीचा मेल पाठविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी विविध इंटरनॅशनल शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात येत आहे. 16 जूनला गोवंडीतील मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर कनाकिया इंटरनॅशनल तर कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये रायन इंटरनॅशनल या शाळांना दोन स्वतंत्र ईमेल प्राप्त झाले होते. या मेलनंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकासह संपूर्ण शाळा इमारतीची तपासणी केली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नव्हते. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर सोमवारी पुन्हा कांदिवलीतील एका इंटरनॅशनल शाळेत पुन्हा अज्ञात व्यक्तीने मेल पाठवून शाळेत बॉम्ब असल्याचे नमूद केले होते. या धमकीनतर शाळा प्रशासनासह पालक आणि विद्यार्थी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही माहिती प्राप्त होताच समतानगर पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. तपासणीनंतर तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून समतानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांच्या मदतीने तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page