शेअरमध्ये चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणुक
३६ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – बोगस वेबसाईटच्या माध्यमातून शेअरमध्ये चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सुमारे ३६ लाख रुपयांची फसवणुक झाली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज असून या टोळीने आतापर्यंत अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांच्या गंडा घातल्याचे बोलले जाते.
३७ वर्षांचे तक्रारदार अन्वर खटाव हे अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. १८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना व्हॉटअपवर एक मॅसेज आला होता. त्यात शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्याबाबत मार्गदर्शन करणारी आणि गुंतवणुकदारांना मोठा नफा मिळवून देणारी एक लिंक होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना एक नोटीफिकेशन आले होते. ते नोटीफिकेशन ओपन करुन ते स्टॉक एक्सचेंज ग्रुपचे सभासद झाले होते. या गु्रपमध्ये शेअरमार्केटमध्ये कुठल्या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परवाता मिळेल याबाबत माहिती दिली जात होती. दुसर्या दिवशी त्यांना ग्रुपच्या ऍडमिनने त्यांना झोस्का हे ऍप डाऊनलोड करुन त्यात त्यांचे चालू खाते उघडण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ते ऍप डाऊनलोन करुन त्यांचे एक चालू खाते सुरु केले होते. गु्रपमधील बहुतांश सभासदांना एसकेएसए इन्वेस्टमेंट या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला होता. या कंपनीतील गुंतवणुकीवर त्यांना चांगला परवाता मिळेल असे सांगितले जात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अन्वर खटाव यांनी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी मनाली शहा या तरुणीने त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. या गुपच्या माध्यमातून त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
११ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यांनी विविध बँक खात्यात शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी सुमारे ३६ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र चांगला परवाता मिळेल असे सांगून त्यांना कुठलाही परतावा मिळाला नव्हता. त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेतून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना विविध टॅक्स म्हणून अठरा लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी या कंपनीबाबत सोशल मिडीयावर माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता या कंपनीने गुंतवणुकीच्या नावाने अनेकांची फसवणुक केल्याचे समजले. संबंधित आरोपींनी कंपनीची बोगस वेबसाईट तयार करुन त्याद्वारे अनेकांना लिंक पाठवून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. या गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळेल असे सांगून अनेकांची फसवणुक केली होती. त्यांनी पाठविलेली युएस ट्रेझरी विभागाचे प्रमाणपत्रेही बोगस होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या टोळीने अन्वर खटाव यांच्यासह अनेक सभासदांना शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.