पुर्नविकास इमारतीच्या फिनिशिंगसह फ्लॅटच्या आमिषाने गंडा
जयेश तन्नासह इतर तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० मार्च २०२४
मुंबई, – कांदिवलीतील एका पुर्नविकास इमारतीच्या फिनिशिंगच्या कामासह याच इमारतीमध्ये दोन फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे चार कोटीचा अपहार करुन एका बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीची फसवणुक झाल्याचा आणखीन एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चारजणांविरुद्ध कांदिवली पोलिसांनी कट रचून अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांमध्ये दिप विनोदकुमार तन्ना, विवेक जयेश तन्ना, जयेश विनोदकुमार तन्ना आणि क्रिश जयेश तन्ना यांचा समावेश असून ते सर्वजण साई कन्सल्टंट कंपनीचे संचालक आहेत. तन्ना कुटुंबियांविरुद्ध सुरु असलेली फसवणुकीची मालिका अद्याप सुरु असल्याचे या नवीन गुन्ह्यांतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या एक महिन्यांत जयेश तन्नाविरुद्ध डी. एन नगर, गोरेगाव आणि आता कांदिवली पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत जयेश तन्ना हा न्यायालयीन कोठडीत असून लवकरच त्याचा कांदिवली पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.
अमीत पुरुषोत्तम भालिया हे मालाड येथे राहत असून त्यांची भागीदारीमध्ये ड्रिम अलायन्स रिअल्टी नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित असून फ्लॅट्स आणि दुकानाच्या इंटिरियरसाठी प्रसिद्ध आहे. साई कन्सल्टंट कंपनीचे भागीदार तन्ना कुटुुंबियांना त्यांच्या कंपनीची माहिती होती. २०१९ साली तन्ना कुटुंबियांना कांदिवलीतील शांतीलाल मोदी रोड, केआरसीसमोरील जय श्रीनाथ निवास सहकारी सोसायटीचे पुर्नविकासाचे काम मिळाले होते. या ठिकाणी असलेले सोसायटीचे बांधकाम पाडून तिथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होणार होते. सभासदांना फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर उर्वरित फ्लॅटची साई कन्सल्टंट कंपनीकडून विक्री होणार होती. त्यासाठी त्यांच्या कंपनीने अमीत भालिया यांच्या कंपनीला फ्लॅट्ससह पोडियमचे इंटिरियर, बांधकाम आणि प्लास्टरचे काम दिले होते. त्यांच्या कंपनीचे मुंबई शहरात विविध ठिकाणी प्रोजेक्ट सुरु असून या प्रोजेक्टमध्ये त्यांना पुढील काम दिले जाईल असे आश्वासन तन्ना कुटुंबियांकडून देण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या संचालकांची एक बैठक झाली होती. त्यात ६५ हजार स्न्वेअर फुट कामाचे ९०० रुपये प्रति स्न्वेअर फुट दराने इंटिरियर आणि ३९५ प्रति स्न्वेअर फुट दराने बांधकाम आणि प्लास्टरचे काम अमीत भालिया यांच्या कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे इमारतीचे काम होत असताना त्यांनी त्यांचेही काम सुरु केले होते. त्यासाठी त्यांच्या कंपनीने अधिकारी आणि कर्मचार्यांचे पगार, बांधकामासाठी लागणारे साहित्यासाठी स्वतहून पेमेंट केले होते. याकामी त्यांना सुमारे चार कोटी रुपये खर्च आला होता. त्याची सर्व नोंदी लेखी स्वरुपात नंतर साई कन्सल्टंट कंपनीला देण्यात आले होते. कंपनीचा विश्वास संपादन करण्यासाठी तन्ना कुटुंबियांनी काही रक्कमेचे पेमेंट केले होते. मात्र उर्वरित पेमेंटची वारंवार मागणी करुनही त्यांच्याकडून पेमेंट केले जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या कंपनीने काम बंद केले होते. काम बंद केल्यानंतर जयेश तन्नाची मुलगी श्रद्धा तन्ना हिने त्यांना कामाच्या मोबदल्या दोन फ्लॅट देण्याचे मान्य करुन पुन्हा काम सुरु करण्याची विनंती केली होती.
हा प्रस्ताव योग्य वाटल्याने त्यांनी त्यांची ऑफर मान्य केली होती. त्यानंतर त्यांच्यात इमारतीच्या बी विंगमध्ये तेराव्या मजल्यावर दोन फ्लॅट देण्याबाबत एक करार झाला होता. या दोन्ही फ्लॅटचे कंपनीला ऍलोटमेंट लेटर देण्यात आले होते. सव्वादोन कोटीचा प्रत्येक फ्लॅट १०४७ चौ फुटाचा होता. त्यामुळे अमीत भालिया यांनी त्यांना दोन्ही फ्लॅटसाठी प्रत्येकी १ कोटी ९० लाख रुपये दिले आणि उर्वरित रक्कम त्यांच्या कामातून ऍडजस्ट करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी पुन्हा इमारतीच्या इंटेरियर, बांधकाम आणि प्लास्टरचे काम सुरु केले आहे. काही महिन्यानंतर अमीत भालिया यांनी त्यांच्याकडे फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनबाबत विचारणा केली होती. यावेळी श्रद्धाने त्याच्या रॅलीगेटर फायनान्सचे सेटलमेंट सुरु असल्याने ते पूर्ण होईपर्यंत रजिस्ट्रेशन होणार नाही असे सांगितले. तोपर्यंत तिने त्यांना फ्लॅटचे स्टॅम्प ड्युटीची भरण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटची नोंदणी फी आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून सुमारे पाच लाख रुपये भरले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन दिले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा सुरु केली होती. त्यात त्यांना जयेश तन्नाने त्यांना ऍलोट केलेले दोन्ही फ्लॅट त्याचा मुलगा क्रिश जयेश तन्ना याला विकल्याचे दिसून आले.
अशा प्रकारे तन्ना यांच्या साई कन्सल्टंट कंपनीने १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्याच्या पुर्नविकास इमारतीच्या फिनिशिंगचे काम करुन देऊन त्यामोबदल्यात त्यांना दोन फ्लॅट देण्याचे मान्य केले, मात्र या फ्लॅटची परस्पर विक्री करुन अमीत भालिया यांच्यासह त्यांच्या कंपनीची सुमारे चार कोटीची फसवणुक केली. वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही तसेच फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या वतीने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिप तन्ना, विवेक तन्ना, जयेश तन्ना आणि क्रिश तन्ना या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. जयेश तन्ना हा व्हाईट कॉलर गुन्हेगार असून त्याच्यविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तीन, कांदिवली पोलीस ठाणे सहा, डी. एन नगर पोलीस ठाण्यात तीन, आंबोली, गोरेगाव पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या सर्व गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध फसवणुक झालेले बरेच तक्रारदार अजूनही पुढे येत असल्याचे एका अघिकार्याने बोलताना सांगितले.