डेटींग ऍपच्या माध्यमातून मैत्री करुन तरुणीची फसवणुक

चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मित्राला पुण्यातून अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मार्च २०२४
मुंबई, – डेटींग ऍपच्या माध्यमातून एका तरुणीशी मैत्री करुन तिला गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून सुमारे २३ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या वॉण्टेड आरोपी मित्राला चार महिन्यानंतर कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने पुण्यातून अटक केली. प्रितेश प्रेमसिंग दुग्लच ऊर्फ निक्की सिंग असे या ३७ वर्षीय आरोपीचे नाव असून तो पुण्याच्या पिंपरी, एसएनबीपी स्कूल परिसरातील रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रितेशने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

३४ वर्षांची तक्रारदार तरुणी ही कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात तिच्या आई-वडिल आणि भावासोबत राहत असून ती एका आयटी कंपनीत कामाला आहेत. एप्रिल २०२१ रोजी तिची एका डेटींग ऍपवरुन निक्की सिंग या तरुणाशी ओळख झाली होती. चॅटदरम्यान मैत्री झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही मोबाईलसह व्हॉटअप आणि व्हाईस कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी तिने तिच्या आईशी त्याच्यासोबत ओळख करुन दिली होती. काही दिवसांनी त्यांची पहिल्यांदा वेस्टर्न ओबेरॉयमध्ये भेट झाली होती. यावेळी निक्कीने त्याचे खरे नाव प्रितेश दुग्लच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो नेहमी तिला भेटायला मुंबईत येत होता. ऑगस्टला त्याने त्याचा मित्र विश्‍वजी विश्‍वकर्माशी तिची ओळख करुन दिली होती. यावेळी त्याने पुण्यातील भोसरी परिसरात एक प्लॉट घेतला असून तो प्लॉट विकसित करणार असल्याचे सांगितले होते. या प्लॉटमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने तिला २५ ते ३० लाख रुपयांची गुंतवणुक करण्यास सांगितले होते. मात्र इतकी मोठी रक्कम तिच्याकडे नव्हती. त्यामुळे विश्‍वजीतने या दोघांच्या नावावर बिझनेस लोन करुन देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यास ती तयार झाली आणि तिने तिचे सर्व दस्तावेज प्रितेश आणि विश्‍वजीतला दिले होते. या दस्तावेजावरुन तिला एका खाजगी बँकेने सुमारे तेरा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. कर्जाची ही रक्कम नंतर तिच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर तिने ती रक्कम प्रितेशच्या सांगण्यावरुन त्याची आई इंदिरा दुग्लच आणि विश्‍वजीत विश्‍वकर्मा याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर तिने विश्‍वजीतला आणखीन दहा लाख रुपये दिले होते. कर्जानंतर प्रितेशने पहिला हप्ता भरला होता. मात्र नंतर त्यााने कर्जाचा हप्ता करणे बंद केले होते. यावेळी त्याने तिला उर्वरित कर्जाचे हप्ते भरण्यास सांगून तो प्लॉट विकसित कामात व्यस्त असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिने कर्जाचे हप्ते भरण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यानंतर तिने विश्‍वजीतला दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी विश्‍वजीतने प्रितेशच्या सांगण्याने त्याने ती रक्कम त्याच्या नवीन फोर्ड इंडिव्हेअर कार खरेदीसाठी कार शोरुममध्ये दिल्याचे सांगितले.

सप्टेंबर २०२१ पर्यंत तिने विश्‍वजीत आणि इंदिरा दुग्लच यांना सुमारे २३ लाख रुपये दिले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी करुन त्यांनी तिला पैसे परत केले नाही. याबाबत तिने चौकशी केली असता प्रितेशने प्लॉटमध्ये पैसे गुंतवणूकींवर चांगला परतावा मिळेल असे सांगून त्याच्या सांगण्यावरुन विश्‍वजीत आणि इंदिरा यांच्या बँक खात्यात २३ लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने कांदिवली पोलीस ठाण्यात प्रितेश दुग्लच ऊर्फ निक्की सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या प्रितेशला पुण्यातून कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीतून मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. डेटींग ऍपच्या माध्यमातून प्रितेशने तक्रारदार तरुणीशी मैत्री करुन तिची फसवणुक केली होती. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page