समुद्रकिनारा असुरक्षित, कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोट होणार
अज्ञात व्यक्तीच्या धमकीने सुद्रकिनार्यावर चोख बंदोबस्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 सप्टेंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरातील शासकीय-निमशासकीय कार्यालय, विविध दूतावास कार्यालय, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रेल्वे स्थानक, सिनेमागृह, शाळा, कॉलेजमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉलचे सत्र सुरु असताना आता अज्ञात व्यक्तीने मुंबईतील समुद्रकिनारा सुरक्षित नसून कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोट होईल अशी धमकीवजा इशारा दिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 26/11 च्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या धमकीची गंभीर दखल घेत समुद्रकिनार्यावरील बंदोबस्तात प्रचंड वाढ केली होती. समुद्रात जास्तीत जास्त गस्त घालण्याचे आदेश सागरी पोलिासांना देण्यात आले आहे. तसेच नौदलासह राज्य एटीएस आणि गुप्तचर विभागाला ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान धमकीचा कॉल करणार्या व्यक्तीचा शोध सुरु असून हा कॉल कोठून आला आणि कोणी केला याचा तपास सुरु आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे मेल आणि कॉलद्वारे धमकी दिली जात आहे. धमकीच्या कॉलनंतर संबंधित ठिकाणाची बॉम्बशोधक नाशक पथकासह श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली जाते. तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. आतापर्यंत विधानभवन, मंत्रालय, स्थानिक कोर्ट, सेशन आणि मुंबई उच्च न्यायालय, विविध देशांतील दूतावास कार्यालय, महत्त्वाचे रेल्वे स्थानके, इतकेच नव्हे तर शाळा आणि कॉलेजमध्येही अशाच प्रकारच्या बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉल आणि मेल पोलिसांना प्राप्त झाले आहे. आता अज्ञात व्यक्तीने समुद्रकिनार्यावर बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली आहे. नवी मुंबईतील महापे कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन समुद्रकिनार्यावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगून कॉल कट केला होता. या धमकीनंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली होती.
26/11 च्या वेळेस अतिरेकी समुद्रमार्गे मुंबईत आले होते. या पार्श्वभूमीवर या धमकीची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहून बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहे. समुद्रकिनार्यावरील बंदोबस्त वाढविण्यात आला असून सागरी पोलिसांना समुद्रात जास्तीत जास्त गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हा बोगस कॉल असल्याचे उघडकीस आले आहे. कोणीतरी खोडसाळ म्हणून हा कॉल केल्याचे बोलले जाते. तरीही या धमकीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही अशी सूचनाच वरिष्ठांकडून पोलिसांना सांगण्यात आली आहे. हा कॉल कोणी आणि कोठून आला याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर विभागासह एटीएस आणि नौदलालाची ही माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले.