जप्तीची कारवाई केलेला रुम हेव्ही डिपॉझिटवर देऊन गंडा
फसणवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड फ्लॅटमालकाला सहा महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – गृहकर्जाचे हप्ते भरत नसल्याने बँकेने जप्तीची कारवाई केलेला रुम हेव्ही डिपॉझिटवर देऊन एका महिलेची अकरा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड फ्लॅटमालकाला पवई पोलिसांनी अटक केली. राघवेंद्र राजू गवडा असे या आरोपीचे फ्लॅटमालकाचे नाव आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर त्याला सहा महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
हिरल सच्चिदानंद उपाध्याय ही ४२ वर्षांची तक्रारदार महिला पवईतील मिलिंदनगर परिसरात राहते. ती कुकींगचे काम करत असून त्यातून मिळणार्या उत्पनातून तिच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. तिचे स्वतचे घर नसल्याने ती भाड्याच्या रुममध्ये राहते. ऑगस्ट २०२४ रोजी तिला भाड्याने रुमची गरज होती. त्यासाठी तिने तिच्या परिचित लोकांसह ब्रोकरला घराविषयी माहिती दिली होती. याच दरम्यान तिला तिच्या परिचित व्यक्तीने राघवेंद्र गवडा याची माहिती दिली होती. तो पवईतील एमएमआरडीए मिलिंदनगर, इमारत क्रमांक पंधरा, २०६ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होता. ती रुम त्याच्याच मालकीची होती. त्याला त्याची रुम भाड्याने द्यायची होती,
तिने त्याच्या रुमची पाहणी केली होती. तिला रुम आवडला, त्यामुळे राघवेंद्रचा रुम भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्याने तिला हेव्ही डिपॉझिटवर रुम देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्यात अकरा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर एकमत झाले होते. ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्यात एक करार झाला आणि तिने त्याला अकरा लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर राघवेंद्रला तिला रुमचा ताबा दिला होता. २२ ऑगस्ट २०२२ पासून ती रुममध्ये राहण्यासाठी आली होती. सोळा महिने तिथे राहिल्यानंतर डिसेंबर २०२५ रोजी बँकेचे काही अधिकारी तिथे आले होते. त्यांनी रुमवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. त्यांनी रुमवर नोटीस लावून तिला तातडीने रुम खाली करण्यास सांगितले होते.
या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने राघवेंद्रला कॉल करुन ही माहिती दिली, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. उडवाउडवीचे उत्तरे देऊन तिला टाळण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान या रुममध्ये राघवेंद्रने एका बँकेने गृहकर्ज घेतले होते. मात्र त्याने गृहकर्जाचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे त्याला बँकेतून नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटीसला त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे बँकेने त्याच्या रुमवर जप्तीची कारवाई केली होती. या रुमवर बॅकेचे गृहकर्ज आहे, ते गृहकर्ज तो नियमित भरत नाही याबाबत राघवेंद्रने तिला काहीच माहिती दिली नव्हती. तिला अंधारात ठेवून त्याने तिच्यासोबत हेव्ही डिपॉझिटचा करार करुन अकरा लाख रुपये घेतले होते.
हा प्रकार उघडकीस येताच तिने त्याच्याकडे हेव्ही डिपॉझिटच्या अकरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने तिला पैसे दिले नाही. वेगवेगळे कारण सांगून तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. १० फेब्रुवारी २०२६ रोजी बँकेचे कर्मचारी रुमवर आले आणि त्यांनी हिरल उपाध्यायला रुम खाली करण्यास सांगितले. सर्व सामान बाहेर काढून बँकेने रुमवर जप्तीची कारवाई केली. या घटनेनंतर तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राघवेंद्र गवडा याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.
त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. राघवेंद्रची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे रुमचा करार करुन इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.