महागड्या वस्तूची अदलाबदल करुन ऑनलाईन कंपनीची फसवणुक
आंतरराज्य टोळीच्या चौघांना 45 लाखांच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – महागड्या वस्तूंच्या जागी स्वस्तात वस्तूंची अदलाबदल करुन एका ऑनलाईन कंपनीची फसवणुक करणार्या आंतरराज्य टोळीच्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पंकजकुमार हरिराम जिंदल, विजयकुमार महेंद्रसिंग सहारन, समशेरसिंग रघुविल आलान आणि सुमंतकुमार दाऊराम साहू अशी या चौघांची नावे आहेत. यातील सुमंतकुमार हा छत्तीसगढ तर इतर तीन आरोपी हरियाणाचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून विविध इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिकसह दोन महागड्या कार असा सुमारे 45 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या चौघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ऑनलाईन ऑर्डरमधील महागड्या वस्तूंची अदलाबदल करुन त्याजागी किरकोळ व स्वस्त दराचे सामान ठेवून काहीजण ऑनलाईन कंपनीच्या डिलीव्हरी बॉयच्या मदतीने फसवणुक करत असल्याचे काही तक्रारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे यांना प्राप्त झाली होती. ही माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी त्याची गंभीर दखल घेत युनिट आठला संबंधित आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर संबंधित आरोपीची माहिती गुन्हे शाखेकडून काढली जात होती. ही माहिती काढत असताना या गुन्ह्यांतील काही संशयित आरोपी हरियाणा येथून आले असून ते बोरिवली परिसरात दिलेल्या ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांपा मिळाली होती.
या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे, पोलीस हवालदार पाटील, बाराहाते, सोनावणे, अतिग्रे, सकट, पोलीस शिपाई सटाले, काकड यांनी बोरिवली परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी चंदावरकर मार्ग, रिलायन्स डिजीटल स्टोरसमोर आलेल्या पंकजकुमार जिंदल, विजयकुमार सहारन, समशेरसिंग आलान आणि सुमंतकुमार साहू या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत ते ई कॉमर्स कंपनीच्या डिलीव्हरी बॉयच्या मदतीने ऑनलाईन महागडे आणि स्वस्तात वस्तूंची ऑर्डर देऊन त्याची डिलीव्हरी नोंदणीकृत पत्त्यावर न घेता, त्रयस्थ ठिकाणी घेतात. डिलीव्हरी घेताना महागड्या वस्तूंच्या बॉक्सवरील बारकोड स्टिकर काढून, ते स्वस्त वस्तूच्या बॉक्सवर चिटकवून आणि स्वस्त वस्तूंच्या बॉक्सवर महागड्या वस्तूंचे स्टिकर चिटकवून अदलाबदल करत होते.
अशा प्रकारे ही टोळी महागड्या वस्तूंची डिलीव्हरी न करता परत करुन करुन कंपनीकडून रिफंडची रक्कम मिळवत होते. मात्र प्रत्यक्षात स्वस्त वस्तूंचे बॉक्स परत करुन किंमती स्तू संबंधित व्यक्ती अप्रमाणिकपणे स्विकारुन ऑनलाईन कंपनीची फसवणुक करत होते. या टोळीने गेल्या काही महिन्यांत या ऑनलाईन कंपनीच्या लाखो रुपयांच्या इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अपहार करुन फसवणुक केली. त्यांच्याकडून 34 लाख 9 हजार 333 रुपयांचे विविध इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक सामान, सात लाख रुपयांचा एक टाटा कंपनीचा टेम्पो, चार लाखांची एक हुंडाई कार असा 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.